Latest

नाशिक शहरात क्षयरुग्ण शोध मोहीम सुरू, १०० पथके ४९ हजार घरांना भेटी देणार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत शहरात क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली असून, ही मोहीम १३ ऑक्टोबरपर्यंत राबविली जाणार आहे. यासाठी वैद्यकीय विभागाने १०० पथके तयार केली असून, या पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमधील ४९ हजार १३७ घरांना भेटी देऊन, २ ला‌ख २६ हजार २५६ नागरिकांची तपासणी करणार आहे.

या पथकांमार्फत क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन होणार असून, संशयित क्षयरुग्णांची थुंकी, एक्स-रे तपासणी महापालिकेच्या दवाखान्यात होणार आहे. या मोहिमेतून क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना त्वरित मोफत औषधोपचार सुरू करण्यात येतील. तसेच केंद्र शासनामार्फत त्यांचे उपचार सुरू असेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात दरमहा 500 रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देतात. या मोहिमेसाठी शहरातील नाशिक, मध्य नाशिक, सातपूर, नाशिकरोड, सिडको या पाच क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्रस्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रीय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिले असून, हे पथक घरोघरी जाऊन भेटीदरम्यान क्षयरोगाविषयी माहिती देत, मार्गदर्शन करणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक तपासणी झालेल्या घरावर एल अक्षर, क्रमांक व तारीख नोंदविणार आहे.

रुग्णांना मिळणार मोफत शिधा

या मोहिमेत आढळणाऱ्या क्षयरुग्णांना सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान, उपचार सुविधा पुरविणार आहेत तसेच पंतप्रधान क्षयरोगमुक्त कार्यक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, (निक्षय मित्र) यांच्यामार्फत क्षयरुग्णांना मोफत शिधावाटप होते. त्यामुळे नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून क्षयरोगमुक्त भारतसाठी हातभार लावण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले.

क्षयरोगाची लक्षणे –

दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, वजनात लक्षणीय घट होणे, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, थुंकीद्वारे रक्त पडणे.

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत नाशिक शहरात क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली असून १३ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. लक्षणे असलेल्या संशयित क्षयरुग्णांनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी.

-डॉ. आवेश पलोड, शहर क्षयरोग अधिकारी, मनपा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT