Latest

हवेली तहसीलदारांना बळजबरीने लाच देण्याचा प्रकार! गुगल पे वरून परस्पर पाठवले ५० हजार

निलेश पोतदार

लोणी काळभोर ; पुढारी वृत्तसेवा : चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी कारवाई केली. परंतु तहसीलदार कोलते यांच्या संमती शिवाय ट्रक मालकांनी 'गुगल पे' द्वारे 50 हजार रुपयांची लाच परस्पर दिल्‍याचे समोर आले आहे.

या ट्रक मालकाविरुद्ध खडक पोलीस स्टेशन व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हवेली तहसीलदार कोलते यांनी बळजबरीने बेकायदा कामासाठी लाच देऊ केल्‍याची तक्रार दाखल केली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी बस डेपो जवळ ( एम एच १६ टी ४१००) हा ट्रक बेकायदा वाळू वाहतूक करीत होता. हा ट्रक बेकायदा वाळू वाहतूक करत असल्‍याचे हवेलीचे तहसीलदार तृप्ती कोलते यांना आढळून आला.

त्यावेळी ट्रक चालकास ट्रक बाजूला घेण्यास सांगून ट्रक थांबविला. यावेळी ट्रक मधून चालक चावी घेऊन उडी मारून पळून गेला.

तहसीलदार कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन तलाठी किंवा कोतवाल यांना ट्रकच्या ठिकाणी पाठवावे असे सांगितले.

यावेळी ट्रक जवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत कोलते या बसल्या होत्‍या. यावेळी एक तरुण तेथे आला. मी गाडीचा मालक आहे असे सांगत, गाडी सोडण्यासाठी विनंती करू लागला. यावेळी पैशाचे आमिष देऊ लागला.

यावेळी कोलते यांनी त्याला स्पष्ट नकार देऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कोतवाल तंगडे गाडीच्या ठिकाणी आला. त्यावेळी गाडीची तपासणी करून पंचनामा करण्याच्या सूचना देऊन गाडी त्यांच्या ताब्यात देऊन कोलते या तहसील कार्यालयाकडे निघाल्या.

या प्रवासा दरम्यान संबंधीत गाडीचा मालक त्याच्या दुचाकीवरून तहसीलदारांच्या गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवावी म्हणून खाणाखुणा करू लागला. त्याला न जुमानता कोलते कार्यालयात गेल्या व त्यांचे नियमित कामकाज सुरू केले.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या भ्रमणध्वनीवरून कोलते यांना चार मिस कॉल आले. त्या बैठकीत असल्याने त्यांनी ते कॉल स्वीकारले नाहीत. तथापी वारंवार फोन येत असल्याने त्यांनी त्या भ्रमणध्वनीवर बैठकीनंतर कॉल केला.

त्यावेळी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचा बँक खाते नंबर मागितला आणि त्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत असे सांगितले. पैसे कशाबद्दल जमा करायचे आहेत असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, की तुम्ही जी वाळूची गाडी पकडली आहे.

त्या गाडीच्या मालकाने तुमच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यास सांगितले म्हणून तुमचा बँक खाते नंबर द्या असे बोलू लागला. यानंतर फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीस कोलते यांनी खडसावून तुमच्या विरोधात मला लाच देत असल्याबाबतची तक्रार देणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर नियमित काम उरकून कोलते या घरी जाण्यास निघाल्‍या असता, त्यांच्या चालकाने सांगितले की, आज पकडलेल्या अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या मालक व काही लोक गाडी जवळ आहेत आणि तुमच्या सेविंग अकाउंट वर पन्नास हजार रुपये जमा केले आहे असे सांगत होते.

यानंतर कोलते यांनी त्यांचे बँक खाते तपासले असता आधी एक रुपया जमा झाला व त्यानंतर 50 हजार रुपये जमा झाल्याचे आढळले. हे पैसे अनोळखी व्यक्तीकडून 'गुगल पे 'द्वारे सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी जमा झाल्याचे दिसून आले.

या दरम्यान अनाधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक तहसील कार्यालय हवेलीच्या आवारात असल्याबाबतचा तलाठी यांचा अहवाल कोलते यांच्या कार्यालयात जमा झाला आहे. हा ट्रक चोरीला जाऊ नये याकरिता सुरक्षारक्षक मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना सुद्धा मेल द्वारे कळविले आहे.

तरीही सदर वाहन चालकाने त्याचा ट्रक सोडविण्याकरिता कोलते यांना बळजबरीने लाच देऊ केली असल्याने तहसीलदार कोलते यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच स्थानिक खडक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद स्टेशन डायरी मध्ये घेण्यात येणे बाबत कळविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT