चंद्रकांत पाटील म्हणतात; परप्रांतियच गुन्हे करतात का? महाराष्ट्रीय लोक गुन्हे करत नाहीत का? | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणतात; परप्रांतियच गुन्हे करतात का? महाराष्ट्रीय लोक गुन्हे करत नाहीत का?

पुणे : पुढारी वृत्तसेवा

परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का? महाराष्ट्रीय माणूस असे कृत्य करत नाही का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत. गुन्हे आणि अत्याचारांच्या घटनेवरून एखाद्या समाजाला लक्ष करणे योग्य नाही, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अत्याचाराच्या घटना आणि त्यावर सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांवर निशाणा साधला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत परप्रांतीय रिक्षा चालकांसंदर्भात झालेल्या निर्णयावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वरील प्रश्न उपस्थित केले.

ते म्हणाले, ‘शक्ती कायद्याला सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा. मात्र, कोवीडच्या काळात सरकारने शक्ती कायद्यासंबंधी बैठक का घेतली नाही? याचे उत्तर देणे गरजेचे आहे. एखाद्या समाजाला लक्ष करणे दुदैवी असून गुन्ह्यांचा अभ्यास केला तर वेगळेच सत्य बाहेर येईल.’ असेही पाटील म्हणाले.

मातोश्रीत बसून आदेश काढायला काय जाते?

‘भारतीय समाज मोठा असून तो उत्सवप्रिय आहे. हा ‌समाज दीड दीड वर्षे बांधून ठेवल्यावर काय परिणाम होतील याचा विचार करून निर्बंध लावणे गरजेचे आहे. दोन वर्षे वारी रद्द झाल्याने वारीला जायला न मिळालेल्या १५ लाख वाकऱ्यांना विचारा काय होते ते? त्यांना काय जात मातोश्रीत बसून आदेश काढायला!’

असे म्हणत पाटील‌ यांनी गणेशोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीचे समर्थन केले. नागरिकांनी मागील वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लोक मास्क लावून उत्सवासाठी बाहेर पडणारच, असेही ‌ते म्हणाले.

मुले वेडी होतील

सरकार निर्बंध घालून कारवाया करणार असेल, मुलांना जास्त दिवस शाळांपासून दूर ठेवणार असेल, तर मुले वेडी होतील. सरकारला हे करायचंच असेल तर खुशाल करावे, असेही पाटील म्हणाले.

Back to top button