Latest

Tiger Reserve | गोव्यात वाघ नाहीत असे कसे होईल?, भीमगड, तिळारी, म्हादई असा ३ राज्यांतून सुरु आहे वाघांचा स्थलांतराचा प्रवास

दीपक दि. भांदिगरे

कोल्हापूर : वाघ हा जंगलाच्या अन्नसाखळीतील मूख्य घटक. जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचे प्रतिक मानले जाते. पण जंगलातून वाघ नाहीसा झाल्यास जंगलातील अन्नसाखळी तुटते. तसे होऊ नये म्हणून वाघांच्या अधिवासाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. कर्नाटकातील भीमगड वन्यजीव अभयारण्य (Bhimgad Wildlife Sanctuary), दांडेली, गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य, महाराष्ट्रातील तिळारी जंगल, आंबोली, राधानगरी अभयारण्य (Radhanagari Wildlife Sanctuary), कोयना वन्यजीव अभयारण्य (Koyna Wildlife Sanctuary) असा सह्याद्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंतचा (Sahyadri Tiger Reserve) पट्टा वाघांसाठी पोषक बनलाय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुमारे ८ वाघ असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे नुकतेच सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असा ३ राज्यांतून या वाघांचा स्थलांतराचा प्रवास सुरु असल्याचे निरीक्षण वन्यजीवरक्षक तसेच वन्यजीव संशोधकांनी नोंदवले आहे. (Tiger Reserve)

गोव्यातील म्हादई अभयारण्य तसेच अन्य पूरक परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून तीन महिन्यांत अधिसूचित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी गोवा सरकारने केली आहे. गोव्यात वाघ नाहीत असे म्हणू शकत नाही. कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जंगलातून म्हादई अभयारण्यात वाघांचे येणे- जाणे सुरु असल्याचे वन्यजीवरक्षक सांगतात.

कोल्हापूर येथील मानद वन्यजीवरक्षक रमन कुलकर्णी सांगतात की, तिळारीच्या जंगल पट्ट्यात वाघांचे प्रजनन होते. तेथे बछड्यांना जन्म दिला की त्यांचा ठिकाणा ठरलेला असतो. तेथून त्यांचे स्थलांतर होत राहते. काही वाघ दांडेली, भीमगडच्या दिशेने जातात. तर काही म्हादईच्या जंगलाकडे स्थलांतर करतात. काही वाघ दोडामार्ग-आंबोली संर्वधन राखीव, चंदगड, भुदरगड-रांगणा असा प्रवास करत ते राधानगरीच्या अभयारण्यात पोहोचतात. राधानगरीतून विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात आणि त्यानंतर पुढे चांदोली राष्ट्रीय उद्यान असे स्थलांतर करत ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचतात. वाघांना अन्न मिळवण्यासाठी मोठ्या परिसरात वावर ठेवावा लागतो.

तिळारीतून म्हाईदच्या जंगलात वाघांचे स्थलांतर होत असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ८ वाघ असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे सिद्ध झाले आहे. यातील काही वाघ निवासी नाहीत. त्यांचे अन्न आणि प्रजननासाठी स्थलांतर सुरु असते.
– रमन कुलकर्णी, मानद वन्यजीवरक्षक, कोल्हापूर

तिळारी वाघांसाठी महत्त्वाचा कॉरिडॉर

तिळारी जंगल पट्टा वाघांसाठी का खूप महत्त्वाचा आहे याबद्दल बोलताना वन्यजीव संशोधक अतूल जोशी सांगतात की म्हादई, तिळारीतून उत्तरेकडे वाघांचे स्थलांतर होत आहे. त्यासाठी तिलारी हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. वाघांना चांगला अधिवास मिळाला की त्यांचा स्थलांतराचा प्रवास सुखकर होतो. राधानगरी अभयारण्याविषयी बोलताना ते म्हणाले की येथे वाघ निवासी आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाविषयी…

२०२२ मध्ये झालेल्या देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या (TRs) मूल्यांकनात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला (STR) 'अतिशय चांगला' दर्जा देण्यात आला आहे. हा संरक्षित व्याघ्र प्रकल्प १,१६५ चौ.कि.मी.मध्ये पसरलेला आहे आणि त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान (Chandoli National Park) आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांसह जंगली कुत्रे, बिबट्या, गवे, सांबर, रानडुक्कर या प्राण्यांची संख्या चांगली आहे. २०२२ च्या जनगणनेनुसार, भारतात ३,१६७ वाघांची नोंद झाली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT