Latest

कोरोना नंतर आता Lassa Fever चं संकट, तिघांना लागण, एकाचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका कमी होऊन संपूर्ण जग पूर्वपदावर येत आहे. याच दरम्यान आता नव्या एका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. लासा फिव्हर (Lassa Fever) असे या विषाणूचे नाव आहे. ब्रिटनमध्ये लासा फिव्हरची तीन रुग्णांना लागण झाली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

एका वृत्तानुसार, तीन बाधित रुग्ण पश्चिम आफ्रिकेतून प्रवास करुन आलेले आहेत. या विषाणूचा पहिला बळी ठरलेला पहिला रुग्ण ब्रिटनमधील बेडफोर्डशायर येथील आहे. याबाबत ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणेने (UK Health Security Agency) म्हटले आहे की, लासा विषाणूमुळे मृत्यू होण्याची ही ब्रिटनमधील पहिलीच घटना आहे.

भारतात आतापर्यंत या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही आणि आरोग्य तज्ज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील ब्रिटनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सेंटर डिसीज अँड पॉल्यूशनच्या माहितीनुसार, (Lassa Fever) हा विषाणू १९६९ मध्ये नायजेरियात आढळून आला होता. आता ब्रिटनमध्ये या विषाणूची लागण झालेली ३ प्रकरणे समोर आली आहेत. यातील एकाचा मत्यू झालाय.

या विषाणूची लागण झाल्यानंतर मानवात सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण हा विषाणू धोकादायक असून यामुळे बाधित व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. नायजेरियात यामुळे दोन परिचारिकांच्या मृत्यूनंतर या विषाणूबाबत माहिती समोर आली होती.

लक्षणे काय आहेत?

या विषाणूमुळे संक्रमित झाल्यानंतर १ ते ३ आठवड्यानंतर लक्षणे दिसून येतात. सौम्य ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी अशी याची लक्षणे आहेत. त्याशिवाय रक्तस्त्राव, श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी, चेहऱ्याला सूज येणे, छाती, पाठ आणि पोटात दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. या विषाणूच्या संपर्कात आलेले लोक बहिरेपणाचेही बळी ठरू शकतात.

कसा होतो फैलाव?

हा विषाणू उंदरातून मानवात प्रवेश करतो. उंदराच्या मलमूत्राद्वारे दूषित झालेले अन्न सेवन केल्यामुळे हा विषाणू वेगाने संक्रमित होतो. रुग्णाला स्पर्श करणे अथवा गळाभेट घेतल्यानंतर हा विषाणू पसरत नाही. पण संक्रमित व्यक्तीच्या लाळेसारख्या द्रवातून इतरांमध्ये तो पसरू शकतो.

या विषाणूचा कोणाला अधिक धोका?

यूरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (Centre for Disease Control and Prevention) माहितीनुसार, या विषाणूचा अधिक धोका गरोदर महिलांना होऊ शकतो. गरोदरपणातील तिसऱ्या महिन्यांत या विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक असते. या आजाराशी संबंधित मृत्यूदर खूप कमी म्हणजे सुमारे १ टक्के आहे. या विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के प्रकरणांत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तसेच यावर कोणतेही उपचार नाहीत. यामुळे बाधित व्यक्ती गंभीर आजारी पडू शकतो आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी १५ टक्के रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

बचाव कसा कराल?

उंदरापासून फैलाव होणाऱ्या या आजारीपासून बचाव करण्यासाठी उंदरांना घरात थारा देऊ नका. अन्न उंदरांपासून दूर ठेवा. उंदरांपासून बचाव करण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.