खून का बदला खून… दिवसाढवळ्या नंग्या तलवारींचा नाच… भरचौकात वाढदिवसाचे फॅड… हाणामारीतून वर्चस्ववादाची जीवघेणी चढाओढ अशा वेगवेगळ्या कारणांनी रंकाळा टॉवर परिसर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. कित्येक वर्षांपासून येथील वातावरण शांत असले तरी मागील काही दिवस 'लेटरवॉर'मुळे भागात धुसफूस वाढत चालली आहे. 'यू. के.' नावाभोवती फिरणार्या या लेटरबॉम्बमुळे गुजरी, शिवाजी पेठ, उत्तरेश्वर पेठेतील वातावरणही ढवळून निघाले आहे.
रंकाळा टॉवर परिसरातून एका कार्यकर्त्याला बॉस बनविण्यात आले. रंकाळा स्टँड परिसरात भाडेकरू म्हणून राहणारा हा कार्यकर्ता ताराबाई रोडवरील चाकू हल्ल्यामुळे चर्चेत आला. जेलची हवा खाऊनही तो सुधारला नाही तर परिसरातील तरुणांनी गोल्ड मेडल जिंकल्यासारखी त्याची मिरवणूक काढली. गुजरी, शिवाजी पेठेतील काहींनी त्याला मारहाण केली होती.
त्या सगळ्यांचा बदला आता घ्यायचा आहे. रंकाळा टॉवरवरील तरुणांनी एकत्रित येऊन 25 वर्षांपूर्वी जशी रॅली निघाली तशी काढायची आहे. 'यू.के.' नाव मोठे करायचे आहे.' अशा आशयाचे दोन पानी लेटर रंकाळा टॉवर, उत्तरेश्वर पेठ, दुधाळी, शिवाजी पेठेतील काही भागात घरोघरी पोहोचले आहे. त्यावर एकाचे नावही लिहिण्यात आले आहे.
रंकाळा टॉवर येथे काही वर्षांपूर्वी वर्चस्ववादामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली. पुढे म्होरके राजकारणात शिरल्याने कार्यकर्त्यांना मात्र पोलिसांच्या भीतीखाली राहावे लागले. परिसरातील खाऊ गाड्यांवर दमदाटीसाठीही काहींनी 'रंकाळा टॉवर'च्या नावाचा गैरवापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पोलिसांनी ही दहशत मोडून काढली असली तरी सध्या काही रिकामी डोकी हा वाद पुन्हा उफाळून आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
काही नावांचा वापर करून परिसरात लेटर टाकली आहेत. याद्वारे चिथावणी देणारे संदेश दिले आहेत. ही लेटरही घरमालकांच्या नावाने पाठविण्यात येत असल्याने यामागे वेगळीच यंत्रणा काम करीत असल्याची भीती आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकाराची शहानिशा करून हे कृत्य करणार्यांना ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
ज्या घरातील व्यक्ती जाते त्यालाच त्याचे दु:ख समजते. केवळ दुसर्याच्या वर्चस्ववादासाठी घरचा कर्ता मुलगा, बाप गमावलेल्यांना याची झळ पोहोचली आहे. हे प्रकार पुन्हा होऊ न देता रंकाळा टॉवर परिसर शांत राहू द्या, अशी आर्त हाक येथील स्थानिक रहिवाशी देत आहेत.
व्हिडिओ पाहा : माझ्या पतीला निलंबनाची नोटीस आली ; ते सकाळ पासून फोन उचलत नाहीये