Latest

Asia Cup 2023 | पाकची भारतापुढे शरणागती! आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात; पण भारताचे सामने तटस्थ देशात

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांनी हा प्रस्ताव एसीसीकडे पाठवला असून यामध्ये भारत आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळू शकतो तर उर्वरित संघ पाकिस्तानमध्ये खेळतील, असे म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार असेल तर दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे भारतीय संघ तिथे जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर जर भारत पाकिस्तामध्ये खेळण्यास येणार नसेल तर आम्हीदेखील त्यांच्या देशात वन-डे विश्वचषक खेळायला जाणार नाही, असा धमकी वजा इशारा पाकिस्तानने दिला होता. त्यानंतरही बीसीसीआय आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलण्यावर जोरदार चर्चा सुरू होती. पाकिस्तान सोडून अन्य ठिकाणी आशिया चषकाचे सामने झाले तर भारताने खेळण्यास होकार दिला होता. यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख सेठी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेकडे प्रस्ताव दिला आहे. यामध्ये पाकिस्तान आशिया कप सामने घरच्या मैदानावर खेळेल तर भारत त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळेल असे म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील!

आशिया चषक २ ते १७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. मैदानांच्या अनिश्चिततेमुळे सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्यासह पात्र संघ सहभागी होणार आहेत. पात्रता स्पर्धा नेपाळमध्ये सुरू आहे. पुढील महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी भारतात येणार आहेत. त्यांच्या या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानला भारतात जाण्याचा सल्ला

सेठी म्हणाले की, भारतासोबतचे संबंध सामान्य होऊ शकतात, असे आम्हाला सांगण्यात आले. असे झाल्यास भारत २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याचा विचार करेल. आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळण्याबरोबरच विश्वचषकासाठी आम्हाला भारतात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण सेठी यांनी हा सल्ला कोणी दिला याबाबत सांगितलेले नाही. पाकिस्तानने भारतासोबत समान अटींवर क्रिकेट खेळावे, असे आपल्या देशातील जनतेचे मत असल्याचे सेठी यांनी सूचित केले आहे. ते म्हणाले की, भारताविरुद्ध खेळण्यासाठी आमच्या सरकारचे कोणतेही बंधन नाही. परंतु मी लोकांच्या मतावर म्हणू शकतो की आम्ही गरजू नाही आणि आम्ही आर्थिकदृष्ट्या आमच्या पायावर उभे राहू शकतो. आम्हाला भारतासोबत सन्मानजनक क्रिकेट खेळायचे आहे. आमची एसीसीशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT