Latest

डोंबिवली : पाण्यासाठी किती जीवांचा बळी घेणार ? मुलभूत हक्कासाठी आक्रोश करणारा ‘भोंगा’ का दिसत नाही ??

अविनाश सुतार

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान आचार्य : पाण्यासाठी माझ्या मुलांनी वणवण केली आणि आज अखेर त्यांचीही वणवण थांबली. माझी मुलं मला कशी परत मिळतील, असे मन हेलावणारे शब्द होते, ते संदप गावातील खदानीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या दोन मुलांच्या बापाचे. घरात पाणी नसल्याने या गावातील महिलांना वर्षानुवर्ष खदानीजवळ जाऊन कपडे धुवावे लागतात. गावचे पोलीस पाटील असणाऱ्या सुरेश गायकवाड यांची पत्नी, सून आणि नातवंडं हे शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी खदानीवर गेले. कपडे धूत असताना छोट्या मुलाचा पाय घसरून तो खदानीत पडला. आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.

कधी स्वप्नात देखील पाहिलं नाही ते घडलं आणि संपूर्ण कुटुंबावर नव्हे, तर गावावर शोककळा पसरली. त्यानंतर ऐकू येत होता तो केवळ आक्रोश. इतकंच नव्हे, तर माझी मुलं अजूनही जिवंत आहेत. मी त्यांना घ्यायला आले आहे. असे त्या मुलांचे पालक आपल्या नातेवाईकांना कळवळून सांगत होते. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला, त्याचे एकमेव कारण म्हणजे गावात भेडसावणारी पाणीटंचाई.

ठाणे जिल्हा हा संपूर्ण मुंबईची तहान भागविणारा जिल्हा आहे. बारवी, तानसा, भातसा, मध्य वैतरणा यासारखी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधली गेली. त्यानंतर संपूर्ण मुंबई या धरणातून आलेले पाणी पीत असली. तरी ठाणे जिल्हा मात्र अद्यापही पाणीटंचाईच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही. किंबहुना येथील राजकीय नेते याबाबतीत अत्यंत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी दुपारी घडलेली घटना ही डोंबिवली नजीक असणाऱ्या संदप गावात घडली. डोंबिवली शहर हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्रास होणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या इमारतींना पाणीपुरवठा सहज उपलब्ध होतो. मात्र वर्षानुवर्ष आजूबाजूला राहणारे गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत, यासारखी दुसरी शोकांतिका नाही.

महाराष्ट्राचा विचार केला, तर एकीकडे खुर्चीवरून राजकारण सुरू आहे. कोण कोणाला काय म्हणाला आणि त्या नेत्याला आम्ही काय आणि कसे उत्तर द्यायचे, ही व्यूहरचना आखण्यात सर्वच पक्ष सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे सामन्यांच्या जीवनातील संघर्ष बघायला कोणालाही वेळ नाही. कोणाला खुर्चीवर पुन्हा पुन्हा यायचं आहे, तर कोणाला अजान आणि हनुमान चालीसा याच्या आवाजावरून महाराष्ट्राची शांती भंग करायची आहे. कोणाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री कायम बसवायचा आहे. तर कोणाला स्वतःच्या ध्येय धोरणानुसार आपल्याच तालावर इतर पक्षांना नाचवायचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. जाती, धर्म राजकारण यापलीकडे माणुसकीच्या नात्याने केवळ एकदा विचारपूस करा, इतकी साधी अपेक्षा तो सामान्य माणूस बाळगतो.

काल जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपस्थित होते. मात्र नागरिकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत तुम्ही राजकारण करता पण आमचा नाहक बळी जातो. यानंतर आम्ही आता काय करायचे ते सांगा. तुम्ही दोन दिवस भेटायला आणि सांत्वन करायला याल. पण आमची मुलं परत आणून द्याल का ? असा केविलवाणा प्रश्न त्यांना उपस्थित केला. पाणी हे जीवन असताना पण्यासारखी मूलभूत सोय देखील तुम्ही देऊ शकत नाही का ? पाण्यासाठी सुद्धा दिवसाला ६०० रुपये खर्च करायचे असतील, तर का तुम्हाला मत द्यायची, असा संतप्त सवाल त्यांना विचारण्यात आला.

मोदी सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला. मात्र, इंडिया खरंच डिजिटल होत आहे का ? की अधिकाधिक मागासवर्गीय होत आहे, असे एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटीच्या यादीतील शहर आहे. मात्र, स्मार्ट सिटी केवळ कागदावरच असून या शहरातील राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणाच्या जिवापेक्षा काहीच मोठं नसल्याची जाणीव प्रशासन, अधिकारी , राजकारणी आणि सरकार यांना कोणालाच नाही, हीच कदाचित अधोगतीची वाटचाल असावी ?

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT