केजरीवाल यांच्या विरोधातील लढा थांबणार नाही : प्रीतपाल सिंग यांचा इशारा | पुढारी

केजरीवाल यांच्या विरोधातील लढा थांबणार नाही : प्रीतपाल सिंग यांचा इशारा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्या अटकेला पंजाब – हरियाणा उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पक्षादरम्यान शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आप नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील आमचा लढा थांबणार नाही, असा इशारा बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग यांनी दिला आहे.

पुढील दहा तारखेला सुनावणी होईपर्यंत बग्गा यांना अटक करू नये, असे निर्देश पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या सुनावणीवेळी पोलिसांना दिले होते. तत्पूर्वी मोहाली येथील न्यायालयाने बग्गा यांना अटक करून हजर करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने बग्गा यांना तात्पुरता दिलासा दिल्यानंतर प्रीतपाल सिंग यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला. चुकीच्या गोष्टी करीत असलेल्या केजरीवाल यांच्याविरोधातला आमचा लढा थांबणार नाही, असा इशाराही त्‍यांनी दिला.

तेजिंदरपाल सिंग बग्गा हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. पंजाब पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बग्गा यांना अटक केली होती. त्यानंतर पंजाबकडे घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्याला हरियाणा पोलिसांनी अडवित दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

हेही वाचलंत का ?

Back to top button