आभाळाची छाया आई तुझी माया | पुढारी

आभाळाची छाया आई तुझी माया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वात्सल्याची होते बरसात, आई तुझा हात
उन्हात आभाळाची छाया, आई तुझी माया
साठलेला गोड मध, आई तुझे शब्द
पोथी ग्रंथाची खाण, आई तुझे ज्ञान
जिथे विश्व सारे येते, आई तुझे गाणे
मिळे प्रेम आणि शांती, आई तुझी मूर्ती

या कवितेच्या ओळी काल, आज आणि उद्याही आईची महती सांगतील. कारण आई म्हणजे सहवास, आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे माया, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी अशी कित्येक विशेषणे आईसाठी लागू होतात. खरे तर, आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण कधीच परतफेड करू शकणार नाही. मात्र, तरीही तिने आपल्याला दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन. जगभरातील प्रत्येक आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट करणार्‍या प्रत्येक आईचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मातृदिनाची सुरुवात सर्वांत आधी अमेरिकेतून झाली. अमेरिकन अ‍ॅक्टिविस्ट अ‍ॅना जार्विस हिचे आपल्या आईवर प्रचंड प्रेम होते. आईच्या प्रेमापोटी तिने लग्नही केले नव्हते. आईचा मृत्यू झाल्यानंतर अ‍ॅनावर आभाळ कोसळले. पुढे तिने आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक बांधले. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करायला सुरुवात झाली. दरवर्षी मे महिनाच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येतो. आई आपल्यासाठी सर्वस्व आहे. खरेतर आईसाठी एकच दिवस खास असा नसतो. सगळेच दिवस आईसाठी खास असतात. प्रत्येकाच्या जीवनात डोकावून पाहाल, तर व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते, सुसंस्काराने घडविणारी, मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्त्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेऊ शकत नाही.

मातृदिनाच्या तारखेत तफावत : मातृदिनाची कुठलीही तारीख पक्की ठरलेली नाही. पण, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 मध्ये एक कायदा केला होता. या कायद्यात असे होते की, दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जावा. या कायद्यानंतर इतर देशांमध्येही मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जाऊ लागला.

हेही वाचा :

Back to top button