Latest

रत्नागिरी : सनई-चौघड्यांचे मंजूळ सुरात मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात

अनुराधा कोरवी

साडवली : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री. चि. देव मार्लेश्वर व साखरप्याची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) आज(दि.१५) दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सनई चौघड्यांचे मंजूळ सुर घुमले. तर विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थित लाखो भाविकांनी हरहर महादेव… हरहर मार्लेश्वर.. शिवहराचा जयघोष करीत सह्याद्री पर्वतरांगा दणाणून सोडला.

संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कडे-कपारीत निसर्गरम्य ठिकाणी स्वयंभू श्री. देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मकर संक्रांत दिनी मार्लेश्वर शिखरावर मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाहसोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने हिंदू लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार रविवारी दुपारी संपन्न झाला. या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी दोन दिवस अगोदरपासूनच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सुरू होती.

मार्लेश्वराची पालखी, गिरीजादेवीची पालखी व यजमान व्याडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे आज सकाळी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री वराडी मंडळीसह आगमन झाल्यानंतर मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान आदी विवाह सोहळ्यापूर्वीचे प्रथेपरंपरेप्रमाणे सर्व विधी पार पडले. यानंतर विवाह सोहळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी तब्बल ३६० मानकरी यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले.

मार्लेश्वर व गिरीजादेवीच्या विवाह सोहळ्याला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आंगवलीचे अणेराव मार्लेश्वरचा टोप मांडीवर घेऊन तर लांजेकर स्वामी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसले. यावेळी लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी विवाह सोहळा दुपारी एक वाजून पाच मिनिटांच्या शुभमुहूर्तावर रायपाटणकर स्वामी, म्हासोळकर स्वामी आणि लांजेकर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी आपल्या डोळ्यात हा अभूतपूर्व विवाह सोहळा साठवून ठेवला. तर सनई चौघड्यांचे मंजुळ सूर सह्याद्रीच्या कडे कपारीत पर्वतरांगांमध्ये घुमले. या विवाहसोहळ्याला माजी आमदार सदानंद चव्हाण, नेहा माने, जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, संतोष केदारी, बापू शेट्ये, प्रद्युम्न माने, सुबोध पेडणेकर, सचिन मांगले आदी उपस्थित होते.

दरम्यान, या विवाहसोहळ्या दरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरुखचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, रत्नागिरीच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे शहा आदींच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर यासोबत देवरुख आगराच्या वतीने दिवसभर जादा एसटी फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच आरोग्य विभाग व महावितरण विभागही तैनात होता.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT