Latest

ठाणे : भुजबळांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष

backup backup

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे ठाण्यात तीव्र पडसाद उमटले. भुजबळांच्या या विधानाबाबत शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले. भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. तर याला अजित पवार गटानेही त्याच भाषेत प्रतिउत्तर देत काही वेळातच अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिलीच सभा बीडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेला मंत्रीमंडळातील राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री सहभागी झाले होते. शरद पवार यांची बीडमध्ये सभा झाल्यानंतर अजित पवार यांची सभा ही उत्तर सभा होती, असेही म्हटले जात आहे. या सभेत अजित पवारांपेक्षा जास्त गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केले. छगन भुजबळ या सभेत शरद पवारांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र भुजबळांच्या वक्तव्यानंतर ठाण्यात मात्र राष्ट्रावादीच्या दोन्ही गटात संघर्ष पाहायला मिळाला.

शरद पवार गटाकडून छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी

जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून भुजबळ यांचा गद्दार असा उल्लेख करीत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला.या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले , भुजबळ यांच्यावर शरद पवार यांनी प्रचंड प्रेम केले होते. तुरुंगातून सुटल्यानंतरही भुजबळ यांना शरद पवार यांनी मंत्रीपद दिले. शरद पवार यांच्याकडून सर्व मिळवून मोठे झाल्यानंतर भुजबळ हे गद्दारी करत असतील. तर आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या दैवताचे फोटो वापरतात आणि आमच्याच दैवताचा असा अपमान करणार असाल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या कृतीला आम्ही उत्तर देऊच, असा इशारा देसाई यांनीही दिला.

अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी

दुसरीकडे भुजबळ यांचा पुतळा जाळल्यानंतर अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेसमोर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, छगन भुजबळसाहेब झिंदाबाद, एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरु वाघमारे, ठामपा परिवहन सदस्य मोहसीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे आदरणीय नेते व बहुजनांचे नेते छगन भुजबळसाहेब यांनी काही कथित वक्तव्य केली म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळसाहेबांचा पुतळा जाळला. त्यांना गद्दार म्हटले. आव्हाड यांचा विरोध केला की गद्दार! मुळात गद्दार कोण हे या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून राष्ट्रवादी काॅग्रेस कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून उत्तर दिले आहे. यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. हातात दोरा गंडा बांधून पुरोगामी भाषा करुन कोणी बहुजन नेता होत नाही. यांचे ठाणे व येऊर येथील बंगल्यात काय धंदे चालतात त्याची शोधपत्रकारिता करावी, अशी प्रतिक्रिया यावेळी आनंद परांजपे यांनी दिली.

काय म्हणाले छगन भुजबळ…

२०१९ मध्ये अजित दादांनी सकाळी शपथविधी घेतली, तुम्ही सांगितलं की ती गुगली होती. ही कसली गुगली? स्वतःच्याच प्लेअरला आऊट करायचं का? राजकारणात अशा गुगल्या असतात का?, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला. आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, मी स्वत: अडीच वर्षे आतमध्ये राहिलो, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार साहेबांनी बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत छगन भुजबळ, दुसऱ्या बैठकीत धनजंय मुंडे, तिसरा नंबर हसन मुश्रीफ यांचा. इकडून गाडी बारामतीहून फिरून आली की अजितदादा आमचे नेते आहेत. आमच्याविरोधात मीटिंग झाल्यानंतर बारामतीचा प्रश्न आला की अजित पवार आमचे नेते आहेत असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणणार. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊन टाका आणि मिटवून टाका भांडण, नेते आहेत ना तुमचे! असंही छगन भुजबळ म्हणाले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT