नवी दिल्ली : बुद्धीचे दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या गणपती बाप्पाची जगातील सर्वात उंच मूर्ती कोठे आहे? असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला अशी गणेशमूर्ती भारतात आणि तेसुद्धा महाराष्ट्रात आहे, असेच वाटेल. कारण, या राज्यात मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, ज्यावेळी जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती चा विषय येतो, तेव्हा भारताचा नव्हे तर थायलंड चा उल्लेख करावा लागतो.
थायलंडमधील ही मूर्ती अनेक शतकांपूर्वीची नसून ती अवघी नऊ वर्षांपूर्वी तयार करण्यात आली आहे. तब्बल 39 मीटर उंच असलेली ही गणेशाची उभी मूर्ती थायलंडमधील ख्लाँग ख्वेन शहरात विसावली आहे. उल्लेखनीय म्हणजे जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळख असलेली गणेशाची ही मूर्ती गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.
कांस्य धातूपासून तयार केलेली ही मूर्ती निरखून पाहिल्यास डोक्यावर कमळाचे फूल असून, मध्ये ओम तयार करण्यात आले आहे.
ही मूर्ती वेगवेगळ्या तब्बल 854 भागांनी तयार करण्यात आली आहे. पार्कसह मूर्ती उभारण्यासाठी 2008 ते 2012 अशी केवळ चार वर्षेे लागली.
थायलंडमध्ये जी चार फळे अत्यंत पवित्र मानली जातात, ती फळे गणेशाच्या हातात ठेवण्यात आली आहेत.
यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळी यांचा समावेश आहे. गणेशमूर्ती च्या पोटाला नागराजाने वेटोळा घातला असून, सोंडेत लाडू तसेच पायाजवळ मूषक आहे.
थायलंडमध्ये गणेशाला ज्ञान आणि बुद्धीचे दैवत मानले जाते. जगातील सर्वात उंच असलेली ही मूर्ती कोणी उभारली? असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
थायलंडमधील अयोध्या म्हणजे अयुथ्या साम्राज्यावेळी सन 1549 मध्ये चाचोएंगशाओ नामक शहर वसविण्यात आले. याच शहरातील चाचोएंगशाओ नामक संस्था नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असते.
या संस्थेचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातील सर्वात मोठी गणेशाची मूर्ती उभारण्याचा संकल्प सोडला. त्यानंतर ख्लाँग ख्वेन शहरात सुमारे 40 हजार चौरस जागा शोधण्यात आली.
ही जागा सुपीक असल्यानेच मूर्ती उभारण्यासाठी ती निवडण्यात आली. सर्वप्रथम तेथे गणेश इंटरनॅशनल पार्क तयार करण्यात आले.
त्यानंतर तेथे एखाद्या देवाची, पण जगातील सर्वात उंच मूर्ती उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला आणि बाप्पाची मूर्ती उभारण्यावर एकमत झाले.
ही मूर्ती म्हणजे प्रख्यात मूर्तिकार पिटक चर्लेमलाओ यांच्या उत्कृष्ट कलाकारीचा नमुनाच आहे.