न्यूयॉर्क: अंटार्क्टिकातील बर्फाला 'टाईम कॅप्सूल' असेही म्हटले जाते. काळानुसार पर्यावरणात झालेले बदलाचे पुरावे या बर्फाच्या चादरीत दबून राहिलेले आहेत. हे पुरावे कित्येक वर्षे तसेच राहू शकतात. याच बर्फाचा अभ्यास करून प्राचीन काळात घडलेल्या घटनांची माहिती मिळविली जाऊ शकते. असाच एक प्रयत्न आता अमेरिका करणार आहे.
अमेरिकेतील 'ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी'च्या नेतृत्वाखालील एक नवे संशोधन करण्यात येणार आहे. या संशोधनाच्या माध्यमातून अंटार्क्टिकामधील सर्वात जुना बर्फ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या बर्फाचा अभ्यास करून जलवायू परिवर्तन कसे होत गेले, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
अंटार्क्टिकामधील बर्फाच्या (टाईम कॅप्सूल) तुकड्यापासून जलवायू परिवर्तनाचे पुरावे शोधण्यासंदर्भात करण्यात येणार्या या संशोधनासाठी सर्वप्रथम 2.5 कोटी डॉलर्सचा निधीतून 'सेंटर फॉर ओल्डेस्ट आइस एक्स्प्लोरेशन' स्थापन केले जाणार आहे.
या सेंटरमध्ये जगभरातील शास्त्रज्ञ पृथ्वीच्या वातावरणाशी संबंधित आणि बदलत्या जलवायू परिवर्तनासंदर्भात चर्चा करणार आहेत. ओएसयूचे कॉलेज ऑफ अर्थ, ओशन अँड अॅटमोस्फेरिक सायन्सेसचे पेलिओ क्लायमॅटोलॉजिस्ट डॉ. अॅड ब्रूक यांच्या मते, या संशोधनाच्या माध्यमातून गेल्या दहा लाख वर्षांत पृथ्वीवर कसे बदल होत गेले, याचा शोध लावला जाणार आहे.
तसे पाहिल्यास आतापर्यंत आठ लाख वर्षांपूर्वी अंटार्क्टिकामधील बर्फाचा सर्वात जुना नमुना सापडला आहे. मात्र, ब्रूक यांच्या मते, नव्या संशोधनाच्या माध्यमातून बर्फात ड्रिलिंग करून 15 लाख वर्षांपूर्वीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून जलवायू परिवर्तनाला समजणे शक्य होईल.