कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटांनी उचलले | पुढारी

कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटांनी उचलले

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणांतर्गत विभागात पडत असलेला पाऊस व धरणात प्रतिसेकंद सरासरी 23,910 क्युसेक येणारे पाणी व धरणातील उपलब्ध 103.95 टीएमसी पाणीसाठा व संपुष्टात आलेली पाणीसाठवण क्षमता लक्षात घेऊन धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी संध्याकाळी पाच वाजता एका फुटावरून अडीच फूट करण्यात आले.

त्यातून प्रतिसेकंद 22,730 क्युसेक व धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून 1050 क्युसेक असे प्रतिसेकंद एकूण 23,780 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 103.95 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आता धरणात केवळ 1.30 टीएमसी इतकेच पाणी सामावून घेतले जाऊ शकते. त्याचवेळी सध्या प्रतिसेकंद धरणात सरासरी 23,910 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे सध्या येणारे पाणी धरणाची, संपुष्टात आलेली साठवण क्षमता व अद्यापही प्रलंबित असलेला पाऊस लक्षात घेता कोयना धरण व्यवस्थापनाने रविवारपासून पुन्हा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एका फुटाने तर संध्याकाळी पाच वाजता तेच दरवाजे अडीच फुटांनी वर उचलून त्यातून 22,730 क्युसेक्स व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 1050 क्युसेक्स असे एकूण 23,780 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

यापुढे धरणातील पाण्याची आवक वाढली तर याहीपेक्षा ज्यादा प्रमाणात पाणी पूर्वेकडे कोयनाच्या नदीपात्रात सोडण्यात येईल, अशी माहितीही कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहेत.

कोयनाची सध्याची स्थिती लक्षात घेता एकूण उपलब्ध पाणीसाठा 103.95 टीएमसी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 98.95 टीएमसी, पाणीउंची 2162.6 फूट, जलपातळी 659.130 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे कोयना 3999 मिलिमीटर, नवजा 5259 मिलिमीटर व महाबळेश्वर 5317 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button