Latest

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी तेलंगणाच्या के. कविता चौकशीसाठी ED समोर हजर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने-ED) तीन दिवसांपूर्वी समन्स बजावले होते. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांची आज ED कडून चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान त्या काही वेळापूर्वी ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. कविता दक्षिणेतील मद्य कार्टेलचा प्रमुख भाग असून, मद्य घोटाळ्यात त्यांनी मोठा फायदा मिळवला असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला असून, याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.

ईडीने बजावलेल्या समन्सवर बोलताना के. कविता यांनी तपासात मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. ईडीने मला 9 मार्चला समन्स बजावले होते, मी 16 मार्चला हजर राहण्यासाठी अर्ज केला होता. पण ईडीला काय घाई आहे माहित नाही, म्हणून मी आज 11 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्यास होकार दिला असल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या जूनपासून भारत सरकार सतत तेलंगणात तपास यंत्रणा पाठवत आहे.. का…? तर तेलंगणात नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत", असा आरोप देखील के. कविता यांनी केला आहे.

के. कविता यांचा केंद्र  सरकारवर आरोप

दरम्यान ईडीने बजावलेल्या समन्सवर प्रतिक्रिया देताना के. कविता यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून, कायदेशीर सल्ला घेत असल्याचे म्हटले आहे. तपास संस्थांना सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच केंद्रातील सत्ताधारी लोक विरोधी पक्षांना धारेवर धरत, तपास संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप कविता यांनी केला आहे.

मद्य घोटाळाप्रकरणी यापुर्वीही 'या' व्यक्तींना समन्स

यापूर्वी दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी १२ डिसेंबर रोजी सीबीआयने भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्यांची हैदराबादमध्ये सात तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. तसेच याप्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्र पिल्लई याला १३ मार्चपर्यंत ईडी कोठडी तर मद्यविक्रेते अमनदीप धल्ल याला २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर कविता यांना समन्स बजावण्यात आला आहे.

मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळाप्रकरणी अटक

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी अटक केल्यानंतर हे समन्स जारी करण्यात आले आहेत. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी अबकारी धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या चालू तपासात अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने त्यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT