मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गुजरात येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांना आज (दि.२५) गुजरात एटीएसकडून मुंबईत अटक करण्यात आली. सांताक्रूझ पोलिसांच्या मदतीने सेटलवाड यांना ताब्यात घेऊन सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले.
(Teesta Setalvad) गुजरातला २००२ मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२४) फेटाळून लावले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी न्यायालयाचा निकाल अतिशय काळजीपूर्वक वाचला आहे. निकालात तिस्ता सेटलवाडच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. तिस्ता सेटलवाड हिने पोलिसांना दंगलीबाबत निराधार आणि खोटी माहिती दिली होती, असेही शहा यांनी या वृत्तसंस्थेला सांगितले.
याप्रकरणात गुजरात एटीएस तिस्ता सेटलवाड यांना अटक करण्यासाठी शनिवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. सेटलवाड राहत असलेल्या सांताक्रूझ पश्चिम येथे सांताक्रूझ पोलिसांच्या मदतीने सेटलवाड यांच्या घरी ते दाखल झाले. त्यांना ताब्यात घेऊन सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून गुजरात येथे नेले.
हेही वाचलंत का ?