‘ईडी’च्या कारवाईमुळे १६ आमदारांचे बंड, त्‍यांचा हिंदूत्वाशी संबंध नाही : संजय राऊत | पुढारी

'ईडी'च्या कारवाईमुळे १६ आमदारांचे बंड, त्‍यांचा हिंदूत्वाशी संबंध नाही : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने ‘ईडी’चा वापर करून कारवाया केल्या त्यामुळेच आमदारांनी बंड केले आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अनिल बाबर हे काँग्रेस-राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले ते काय आम्हाला हिंदूत्व शिकवत आहेत, असा सवालही त्‍यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत संजय राऊत म्‍हणाले की, बंड केलेले अनेक मंत्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित होते. मात्र, दुसऱ्याचं दिवशी ‘ईडी’ कारवाईच्या भीतीमुळे गुवाहाटीत ‘शिंदे’ गटात सामील झाले. गुलाबराव पाटील जुने शिवसैनिक आहेत. माझ्‍या सारख्‍या टपरीवाल्याला शिवसेनेने मंत्री केले, असे स्‍वत: गुलाबराव पाटील  सांगतात. तरीही ते बंड करून एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत, अशी खंतही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

ठाण्याचे एक आमदार दिल्लीत काम आहे, असे सांगून गेले. अमित शहा यांनी ठाण्याच्या आमदाराला सांगितले की, ‘ईडी’कडील असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये क्लिन चीट दिली आहे, असे सांगितले. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी या वेळी केला. माझ्यावर, अनिल परब यांच्यासारख्‍या नेत्‍यावर ‘ईडी’ने कित्येक कारवाया झाल्या मात्र आम्ही झुकलो नाहीत, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button