Latest

Team India World Cup Jersey : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च! (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India World Cup Jersey : भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या तयारीदरम्यान, विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. टीम इंडियाचे अधिकृत किट प्रायोजक अदिदासने एक व्हिडिओ शेअर करून नवीन जर्सी जगासमोर आणली आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह अनुभवी फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराजसह अनेक खेळाडू दिसत आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

टीम इंडियाची जर्सी लॉन्च (Team India World Cup Jersey)

अदिदासने आपल्या अधिकृत सोशल अकाउंटवरून टीम इंडियाची जर्सी लॉन्च केली आहे. अदिदासने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतातील प्रसिद्ध गायक आणि रॅपर रफ्तार याने '3 का ड्रीम' हे गाणे गायले आहे. या गाण्यावरच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराजसारखे स्टार खेळाडू नव्या जर्सीत दिसत आहेत.

जर्सीमध्ये काही बदल (Team India World Cup Jersey)

टीम इंडियाने तिसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची कोट्यवधी चाहते वाट पाहत आहेत. या तिसर्‍या विजेतेपदाची प्रतीक्षा लक्षात घेता '3 का ड्रीम' या स्वप्नगीताची निर्मिती करण्यात आली आहे. आदिदासने या गीताच्या माध्यमातूनच टीम इंडियासाठी बनवलेली जर्सी लाँच केली आहे. ही जर्सी अतिशय आकर्षक आहे. भारतीय संघाच्या सध्याच्या जर्सीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नवीन जर्सीमध्ये खांद्यांवरच्या तीन पांढर्‍या पट्ट्यांच्या जागी कंपनीने भारतीय ध्वजाचे तीन रंग (केशरी, पांढरा आणि हिरवा) ठेवला आहे. जर्सीच्या छातीच्या डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आणि त्यासोबत दोन स्टार आहेत. हे दोन स्टार म्हणजे 1983 आणि 2011 मध्ये जिंकलेल्या दोन वनडे विश्वचषकाचे प्रतिक आहेत.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी

भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. संघाचा दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी लढत आहे. यानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध ग्रुप स्टेज मॅच खेळणार आहे. नेदरलँड विरुद्धचा सामना 12 नोव्हेंबरला बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT