Latest

Teacher News : शिक्षकांना जड झाले ओझे; अन्य कामांमुळेच घसरला शिक्षणाचा दर्जा  

अमृता चौगुले
पुणे : गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवायची जबाबदारी शिक्षकांवर आहे. परंतु, शासनाने शिक्षकांच्या माथ्यावर 75 ते 135 प्रकारच्या  अशैक्षणिक कामांचा बोजा मारला आहे. या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली शिक्षक दबल्यामुळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे आम्हाला केवळ शिकविण्याचेच काम करू द्यावे, असे आर्जव शिक्षक तसेच शिक्षक संघटनांनी राज्य शासनाला केले आहे.
शिक्षक आणि त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे ही अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत. राज्य शासनाकडून वारंवरा शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जातात, शिक्षक संघटना त्यास विरोध करतात.  अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकतात, काही वेळा शासन निर्णय बदलतो किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात. शिक्षकांना काय काम असते, अशा भावनेने शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात.
त्यामुळे साहजिकच त्यांचे शिक्षणाच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष होते. परिणामी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरू लागतो. दर्जा घसरला, शाळांचा निकाल कमी लागला किंवा विद्यार्थी अप्रगत राहिले, मागच्याच वर्गात पुन्हा बसले की शिक्षकांवरच ताशेरे ओढले जातात. या अशैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी दिली, तरच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, असा आक्रमक पवित्रा घेत आता शिक्षकांनी अशैक्षणिक कामांमधून सुटका होण्यासाठी आज शिक्षकदिनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांना असलेली अशैक्षणिक कामे…

मतदार नोंदणी आणि मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, बीएलओ कुटुंब सर्वेक्षण, विविध प्रकारची ऑनलाइन माहिती भरणे, उपस्थिती भत्त्याच्या नोंदी करणे, 40 पेक्षा जास्त नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, लसीकरण मोहीम राबवणे, जंतुनाशक गोळ्या वाटप व अहवाल देणे, शासनाच्या कोणत्याही मोहिमेच्या प्रचारासाठी प्रभातफ ेरी काढणे, माध्यान्ह भोजनाच्या नोंदी करणे/ हिशेब ठेवणे, भाजीपाला खरेदी करणे त्याचा हिशेब ठेवणे, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, लोकांकडून देणगी जमा करून शाळेच्या गरजा भागवणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे, वेगवेगळ्या योजना व परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरणे, घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे, पोलिस पंचनाम्यामध्ये पंच म्हणून उपस्थित राहणे, शासनाच्या विविध विभागांना सहकार्य करणे, वृक्षलागवड अहवाल देणे, सरल प्रणालीची माहिती भरणे, युडायस माहिती भरणे, कोकणात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शिक्षकांची नेमणूक, गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांची व्यवस्था करणे, अशी विविध प्रकारची छोटी-मोठी मिळून  75 ते 135 अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागत आहेत.

एकशिक्षकी शाळेचे हाल…

ज्या शाळेमध्ये केवळ एक शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये तर शिक्षकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांच्या नाकी नऊ येत आहे. एखाद्या दिवशी सुटी घेतली तरी शाळा बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येते.
शिक्षकांची ज्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे काम त्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यांच्यावर एका बाजूने अशैक्षणिक कामांचा बोजा टाकला जातो आणि दुसर्‍या बाजूने शिक्षणाचा दर्जा घसरला, अशी ओरड केली जाते, हे योग्य नाही. राज्य सध्या 'ड' श्रेणीच्या खाली आहे. शिक्षण विभागाला मोठ्या प्रमाणात भ—ष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून घेऊन त्यांच्याकडून शिकविण्याचेच काम चांगल्या प्रकारे कसे होईल, यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– प्रा. संतोष फाजगे, सरचिटणीस, 
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ 
राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील शिक्षकांना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली अनेक अशैक्षणिक कामे लावली जातात. या अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांचा वेळ गेल्यामुळे त्यांचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. इतर कामे राष्ट्रीय काम म्हणून लावली जात असतील तर सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणे हे काम राष्ट्रीय नाही का? असा प्रश्न पडतो. यासाठी शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच काम द्यावे, यासाठी आम्ही आज शिक्षकदिनी काळ्या फिती लावून काम करीत आहोत.
– बाळकृष्ण तांबारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, 
प्राथमिक शिक्षक महासंघ
शिक्षकांना 75 पेक्षा अधिक अशैक्षणिक कामे दिली जातात, असे अनेक शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा काम करण्याचा उत्साह कमी होत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबाबतीत असा प्रसार सातत्याने घडतो. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना अधिक प्रोत्साहित करणे, सातत्याने प्रयोगशील असण्याची गरज आहे. सरकारी शाळा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत.
– मुकुंद किर्दत, समन्वयक, 'आप' पालक युनियन  
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT