राजापूर, पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या संपात सहभागी झाल्याने निलंबित करण्यात आलेले राजापूर (ST employee) आगारातील चालक आणि वाहक, अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते (वय-३५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.
गेले काही दिवस राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा (ST employee) संप सुरू असून संप मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे सातत्याने आवाहन शासनाकडून हाेत आहे. सेवेत हजर न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
राजापूर आगारातील सुमारे वीस आणि पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामध्ये गेली चार वर्षे चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे राकेश रमेश बांते यांचाही सामावेश होता. या महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तणावाखाली होते अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.
अत्यावस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले. तेथे उपचार असताना रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांची मृत्यू झाला.
राकेश रमेश बांते हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. पत्नी व दोन मुलांसह राजापुरात रहात होते.