Latest

Mohammed Zubair : सर्वोच्च न्यायालयाने वाढविला झुबेरचा अंतरिम जामीन

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जातीय तेढ वाढविल्याचा गंभीर आरोप असलेला अल्ट न्यूजचा मालक मोहम्मद झुबेर (Mohammed Zubair) याचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत वाढविला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे दाखल असलेल्या प्रकरणात झुबेरला हा दिलासा मिळाला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे हटविले जावेत, अशा विनंतीची झुबेरची (Mohammed Zubair) याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्याला झुबेरने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. यावर न्यायालयाने एका महिन्याच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. झुबेरविरोधात दिल्ली आणि लखीमपूर येथेही गुन्हे दाखल आहेत.

समाजात तेढ वाढविल्याचे सांगत उत्तर प्रदेश पोलिसांनी झुबेरविरोधात २०२१ साली गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, दिल्ली येथे दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी झुबेरच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी घेतली जाणार असल्याचे पतियाला हाऊस न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. २०१८ साली केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल दिल्ली पोलिसांनी गत महिन्यात झुबेरला अटक केली होती. झुबेरने केलेल्या ट्विटमुळे गेल्या चार वर्षात देशात कुठेही जातीय हिंसाचार अथवा दंगल झालेली नाही, असा युक्तिवाद झुबेरच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT