Latest

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना इतर देशांत अपूर्ण कोर्सेस पूर्ण करण्याची मुभा

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्धामुळे युक्रेनमधून परतावे लागलेल्या विद्यार्थ्यांना आपले वैद्यकीय शिक्षण जगातील इतर देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये घेता येणार आहे. राष्ट्रीय वैद्यक परिषद अर्थात एनएमसीने याबाबतची परवानगी दिली आहे.

विद्यार्थ्यांचे त्यांचे अर्धवट पडलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी एनएमसीने अॅकॅडमिक मोबिलिटी कार्यक्रम जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे अर्धवट राहिलेले शिक्षण भारतात मात्र पूर्ण करता येणार नाही, असे एनएमसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर ज्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील शैक्षणिक संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता, त्यांना जगातील इतर देशांत उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

अॅकॅडमिक मोबिलिटी कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ज्या युक्रेनियन विद्यापीठात प्रवेश घेतला होता, त्या विद्यापीठाची पदवी दिली जाईल. विदेशात थोडे शिक्षण घेऊन राहिलेले शिक्षण भारतात पूर्ण करण्याबाबत इंडियन मेडिकल कौन्सिल अॅक्ट १९५६ तसेच एनएमसी कायदा २०१९ मध्ये तरतूद नसल्याचेही राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT