पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून (दि.१८) सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज आज जुन्या इमारतीतच झाले. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसद भवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधानांच्या आठवणी सांगितल्या. मनमोहन सिंग यांच्याबाबत बोलतांना अधीर रंजन चौधरी म्हणाले, 'ज्यांच्यावर भाजपचे नेते मौन बाळगल्याचा टोला मारायचे, ते मनमोहन सिंग गप्प बसत नव्हते, तर ते कमी बोलायचे आणि काम जास्त करायचे."
संबंधित बातम्या :
खासदार अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, "आजचा दिवस भावनिक आहे… आयुष्यात अनेक मित्र आले, अनेक गेले…तसेच सभागृहाचे कामकाजही चालूच राहणार आहे… आज आपल्याला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळत आहे. पोखरण चाचणीच्या वेळी परदेशी सैन्याने आम्हाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही थांबलो नाही. अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण जगाला संदेश दिला. त्या अणुचाचणीनंतर आमच्यावर निर्बंध लादले गेले, ते दूर करण्याचे काम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले, " असे ते म्हणाले.
"आज या (जुन्या) संसदेच्या इमारतीतून बाहेर पडणे हा आपल्या सर्वांसाठी खरोखरच भावनिक क्षण आहे. आम्ही सर्व आमच्या जुन्या इमारतीचा निरोप घेण्यासाठी येथे उपस्थित आहोत. पंडित नेहरू म्हणाले होते, संसदीय लोकशाही अनेक सद्गुणांची मागणी करते, त्यासाठी क्षमता, कामाची निष्ठा आणि स्वयंशिस्त आवश्यक असते. संसदेत त्यांना (पंडित नेहरू) प्रचंड बहुमत मिळाले असले तरी ते विरोधी पक्षाचा आवाज ऐकत होते. त्यांनी कधीही टिंगल केली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू संसदेत भाषण करताना त्यांची वेळ मर्यादा ओलांडली तेव्हाही अध्यक्षांची घंटा वाजायची, यावरून असे दिसून येते की संसदेचा सन्मान महत्वाचा आहे. हेच नेहरूंचे संसदीय लोकशाहीच्या विकासात योगदान होते. आता चांद्रयानाबाबत चर्चा सुरू आहे, पण १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली अणू संशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. तिथूनच आपण सुरूवात केली आणि १९६४ मध्ये इस्रोचा विकास केला, असेही खासदार चौधरी यांनी सांगितले.
१९५० मध्ये जेव्हा आपण लोकशाही स्वीकारली तेव्हा अनेक परदेशी अभ्यासकांना वाटले की इथे लोकशाही अपयशी ठरेल कारण इथे लाखो अंगठेछाप लोक आहेत. तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांनी तर इंग्रज निघून गेल्यास त्यांनी स्थापन केलेली न्यायव्यवस्था, आरोग्य सेवा, रेल्वे आणि सार्वजनिक बांधकामांची संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त होईल, असे म्हटले होते. त्यांनी आम्हाला इतके कमी समजले होते. हे लोक अशिक्षित आहेत, त्यांना कमी ज्ञान आहे, ते लोकशाही कशी टिकवणार असे म्हटले होते. आम्हाला वारंवार विचारलं जातं की तुम्ही ७० वर्षात काय केलं, ७० वर्षात आम्ही या देशाची लोकशाही मजबूत केली. जे पी नड्डा आम्हाला कमी समजतात व INDI म्हणतात, पण नाव बदलून काही होत नाही, आम्ही इंडिया आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले.
हेही वाचा :