Latest

Smrithi Mandhana : सेमीफायनलमध्‍ये टीम इंडियाचा पराभव आणि चर्चा स्मृतीच्या कामगिरीची!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव केला. विजेतेपद पटकावण्याचे टीम इंडियाचे स्‍वप्‍न सलग दुसर्‍यांदा भंगले आहे. मागील  टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्‍ट्रेलियन संघाने टीम इंडियाचा पराभव केला होता. भारतीय संघाने गेल्या १० वर्षांत एकूण पाच बाद फेरीचे सामने खेळला आहे. यातील  पाचही सामन्यांमध्ये सलामीवीर स्मृती मानधनाची बॅट चालली नाही. (Smriti Mandhana) नुकत्‍याच झालेल्‍या टी-20 सेमीफायनलमध्‍येही  आपल्‍या नावाला साजेसी कामगिरी करुन दाखविण्‍यात स्‍मृती अपयशी ठरली. आयसीसी टूर्नामेंटच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये  तिने आजवर केलेली कामगिरी जाणून घेऊया…

महिला विश्वचषक स्पर्धेत मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. उपांत्य फेरीपूर्वी तीन सामन्यांमध्ये तिने १०, ५२ आणि ८७ धावा केल्या होत्या. सलग दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावल्यानंतर सेमीफायनल सामन्‍यापूर्वी तिच्‍याकडून उत्‍कृष्‍ट फलंदाजीचा आशा होत्‍या;पण ती पुन्‍हा अपयशी ठरली. अत्‍यंत महत्त्‍वाच्‍या सेमीफायनल सामन्‍यात स्‍मृती  केवळ दोन धावा करून बाद झाली. (Smriti Mandhana)

स्मृती मानधना तिच्या भारतीय संघाकडून खेळताना पाचव्यांदा बाद फेरीत उतरली. आतापर्यंत बाद फेरीत तिला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 34 आहे.

महिला वनडे विश्वचषक 2017 उपांत्य फेरी सामना

२०१७ महिला वनडे विश्‍वचषक स्‍पर्धेतील  उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. टीम इंडियाला या स्‍पर्धेच्‍या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी होती. भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधना ही बाद होणारी पहिली खेळाडू ठरली. तिने केवळ सहा धावा केल्या. भारताने ४२ षटकांत ४ गडी गमावून २८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव ४०.१  षटकांत २४५ धावांत गुंडाळला गेला. भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ११५ चेंडूत नाबाद १७१ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

महिला वनडे विश्वचषक 2017  फायनल

२०१७ महिला वनडे विश्‍वचषक स्‍पर्धेतील  फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी झाला. लॉर्ड्सवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी  ५० षटकांत सात गडी गमावून २२८ धावा केल्या. टीम इंडियासमोर त्यांच्यासमोर सोपे लक्ष्य होते. भारतीय महिला संघ विश्वचषक जिंकेल, असा विश्वास वाटत होता. स्मृती मानधना पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरली. ती शून्यावर बाद झाली. पूनम राऊतने ८६ आणि हरमनप्रीतने ५१ धावा केल्या. भारतीय संघ ४८.४ षटकांत सर्वबाद २१९ धावांवर आटोपला. हा सामना नऊ धावांनी जिंकून इंग्लंड विश्‍वविजेता संघ बनला.

महिला T20 विश्वचषक २०१८ उपांत्य फेरी

महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना पुन्हा एकदा बाद फेरीत अपयशी ठरली. तिने सुरुवात चांगली केली पण मोठी खेळी खेळण्यात तिला अपयश आले. ती २३ चेंडूत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. भारत १९.३ षटकात ११२ धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडने १७.१ षटकात २ बाद ११६ धावा करून सामना जिंकला.

महिला T20 विश्वचषक २०२० फायनल

टी-20 विश्‍वचषक २०२० च्‍या उपांत्यफेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते. पावसामुळे सामना होऊ शकला नाही. भारताला गटात अव्वल स्थान मिळवण्याचा फायदा झाला. भारतीय संघ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. मेलबर्नच्या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत ४ गडी बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव ९९ धावांवर गारद झाला. या सामन्‍यात स्मृती मानधना हिने आठ चेंडूत केवळ ११ धावा केल्‍या.

महिला T20 विश्वचषक २०२३ उपांत्य फेरी

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. टीम इंडिया २०२० च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरली होती. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संघाने २० षटकात ४ गडी बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला २० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६७ धावाच करता आल्या. अत्यंत जवळच्या सामन्यात भारताचा ५ धावांनी पराभव झाला. स्मृती मानधना पुन्हा एकदा बाद फेरीत अपयशी ठरली. ती फक्त  ३ धावा करून बाद झाली.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT