Latest

त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी, सविस्तर अहवाल सादर करणार

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त इतरांनी प्रवेश करण्याच्या कथित प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केल्याचे जाहीर केल्यानंतर (दि.19) एसआयटी पथकाने त्र्यंबकेश्वर शहरात हजेरी लावत या प्रकरणाची पोलिस ठाणे, स्थानिक नागरिक, मंदिर विश्वस्त यांच्या भेटी घेत माहिती जाणून घेतली.

शुक्रवारी सकाळीच एसआयटी पथक शहरात दाखल झाले होते. यात अप्पर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांचा समावेश होता. सर्वप्रथम या समितीने त्र्यंबक ठाण्यात भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर जाऊन विश्वस्त आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी विश्वस्त संतोष कदम, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, सचिव संजय जाधव, सुरेश गंगापुत्र, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, रवींद्र सोनवणे, कैलास चोथे आदींशी संवाद साधला. त्यानंतर संस्थानच्या कोठी इमारतीत व्हीआयपी कक्षात मंदिर ट्रस्टचे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत घटनेची माहिती जाणून घेतली. मंदिर परिसराला भेट दिली. दरम्यान, एसआयटी पथक येणार असल्याने शासकीय विश्रामगृह व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. तर अर्धा किलोमीटर दूर नाकाबंदी करण्यात आली होती.

सविस्तर अहवाल सादर करणार

शहरात विविध ठिकाणी चौकशी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना एसआयटी पथकप्रमुख सुखविंदर सिंग यांनी सदर घटनेच्या पाठीमागे काय कारण आहे, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी काही लोकांशी चौकशी केली तर आणखी काही जणांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच काही जागांवर भेट जायचे असून, संपूर्ण चौकशीनंतर सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT