पुणे, पिंपरीतील 110 बांधकाम प्रकल्पांमध्ये ‘ई-रजिस्ट्रेशन’ सुविधा सुरू | पुढारी

पुणे, पिंपरीतील 110 बांधकाम प्रकल्पांमध्ये ‘ई-रजिस्ट्रेशन’ सुविधा सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोंदणी व मुद्रांक विभागाने ज्या बांधकाम प्रकल्पात 20 पेक्षा अधिक सदनिका किंवा दुकाने असतील त्या प्रकल्पांमध्ये दस्तनोंदणीसाठी ‘ई-रजिस्ट्रेशन’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील सुमारे 110 प्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून दस्तनोंदणी करता येते.

नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्यात नोंदणी व मुद्रांक विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावित आहे. गेल्या काही वर्षांपासून नोंदणी विभागाने संगणक प्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला आहे. 20 पेक्षा अधिक सदनिका किंवा दुकाने असतील त्या गृहप्रकल्पांमध्ये आता ई-रजिस्टेशन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ही सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच (फर्स्ट सेल) असणार आहे. यामुळे दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत नाही. म्हाडा, पीएमआरडीए यांच्याकडून सोडतीद्वारे वाटप केलेल्या सदनिकांच्या दस्तनोंदणीसाठीसुद्धा ई-रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जास्तीत जास्त विकासकांना या प्रणालीमध्ये सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे.

सदनिकांची दस्तनोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते. पुणे, पिंपरी – चिंचवड शहरात 27 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. गेल्या काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवीन बांधकाम प्रकल्पांना ई-रजिस्टेशन या सुविधेचा फायदा होत आहे.
                                                                  – संतोष हिंगाणे,
                                                                 शहर जिल्हा निबंधक
                                                              तथा मुद्रांक जिल्हाधिकारी

Back to top button