नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राजभवनात शपथविधीला जाण्यापूर्वी माझी सही घेतली गेली. मीदेखील आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता सही केली. मात्र, अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न सांगता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे अन् पाठिंब्यासाठी माझी सही घेत असल्याची बाब समजल्यानंतर मला मानसिक धक्का बसला, अशी प्रतिक्रिया देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांचा पाठिंबा नेमका कोणत्या गटाला याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा नेमका कोणत्या गटाला याबाबतचा फैसला बुधवार (दि.५)च्या बैठकीत होणार होता. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराकडे दोन्ही गटांचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ अजित पवारांसोबत असल्याने जिल्ह्यातील आमदारही अजित पवार गटात सामील होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, आमदार सरोज अहिरे या आजारी असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. अशात आमदार अहिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीतील फुटीवर आपले मत मांडले, मात्र आपला पाठिंबा कोणत्या गटाला हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले.
आमदार अहिरे म्हणाल्या की, शरद पवार की अजित पवार यापैकी कोणता गट निवडावा हा माझ्यासाठी यक्षप्रश्न आहे. यामधून बाहेर येण्यासाठी मला माझ्या कार्यकर्त्यांची भेट घेणे आवश्यक आहे. मतदारसंघाचा सूर समजून घेतल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी पाठिंब्याच्या पत्रावर सही केली असल्याने माझा पाठिंबा गृहीत धरला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अध्यक्ष शरद पवार येत्या शनिवारी येवल्यात जाहीर सभा घेणार आहे. या सभेला तब्येत बरी असल्यास हजेरी लावेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :