शरद पवार यांच्या शक्तिप्रदर्शन बैठकीला सांगलीतून कुमक | पुढारी

शरद पवार यांच्या शक्तिप्रदर्शन बैठकीला सांगलीतून कुमक

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील शक्तिप्रदर्शनासाठी सांगलीतून बरीच कुमक गेली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चारही आमदार तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. महापौर आणि 14 नगरसेवकांची प्रतिज्ञापत्रे राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

राष्ट्रवादीतील भूकंपानंतर बुधवारी पक्षाच्या दोन्ही गटांनी मुंबईत स्वतंत्र बैठक घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शरद पवार यांच्या गटाची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन वांद्रे येथे झाले. सांगलीची राष्ट्रवादी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठीशी आहे. या गटाच्या बैठकीला सांगलीतून मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अविनाश पाटील, युवा नेते शरद लाड, रोहित पाटील, प्रतीक पाटील, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रवादीचे महापालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. आमचा त्यांनाच पाठिंबा आहे, या आशयाची प्रतिज्ञापत्रे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 16 पैकी 14 नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केली. महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी ही प्रतिज्ञापत्रे दिली.

माजी महापौर अजित पवार गटात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शक्तिप्रदर्शनाला सांगलीतून माजी महापौर इद्रिस नायकवडी हे उपस्थित होते. महापालिकेतील राष्ट्रवादीचे अतहर नायकवडी व योगेंद्र थोरात या दोन नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे

Back to top button