Latest

Eknath Shinde : एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनेला गमवाव्या लागणार ठाणे जिल्ह्यातील महापालिका?

Shambhuraj Pachindre

ठाणे, प्रवीण सोनावणे : ठाणे महापालिकेत गेले ३० वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. आनंद दिघेनंतर ठाण्यात शिवसेनेची सत्ता टिकवण्याचे काम हे एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महापालिकेत महत्वाची दिली जाणारी पदे देखील एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच दिली जातात. ठाण्यात एकहाती सत्ता आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेना सोडली तर ठाण्यातील ८० टक्के नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जातील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून ठाणे महापालिकेत असलेल्या सत्तेबरोबरच जिल्ह्यातील इतर महापालिकांमधील सत्ता शिवसेनेला गमवावी लागेल अशी दाट शक्यता आहे.(Eknath Shinde)

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे शिवसेनेमध्ये सध्याच्या घडीला दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना महत्व आहे. शिंदे हे मागील बऱ्याच काळापासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाबरोबरच ठाण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेने आपली विजयी पताका सर्वात आधी ठाण्यात रोवली होती. तेव्हापासूनच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाली तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये एकनाथ शिंदेंचं नावही होतं.

त्यावेळी ठाणे जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ठाण्यात काही ठिकाणी तर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स देखील ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मात्र शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील अशी भूमिका घेतल्याने एकनाथ शिंदेंचं नाव मागे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम शिवसेनेमधील दुय्यम स्तरातील जबाबदारी सोपवण्यात आली. मध्यंतरी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसंदर्भातील समस्यांमुळे कारभार इतर नेत्यांकडे सोपवण्यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या तेव्हा सुद्धा शिंदेंचेचं नाव चर्चेत आलेले. मात्र यासंदर्भातील एकनाथ शिंदे यांची ही अफवा असल्याचे स्पष्ट करत या संपूर्ण चर्चांवर पडदा टाकला होता.(Eknath Shinde)

आता पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आगामी होऊ घातलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा-जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाली तेव्हा सर्वात आधी विरोध ठाण्यातील शिवसैनिकांनी केल्याचं पहायला मिळालं. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. ठाण्यातील शिवसेनेचे बालेकिल्ले असणाऱ्या टेंभी नाका, आनंद मठ, एकनाथ शिंदेंचं निवासस्थान, महानगरपालिका या परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.ठाणे महापालिकेबरोबरच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना मोठा जनाधार आहे. ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे जो निर्णय घेतली तीच ठाणे महापालिकेतील नगरसेवकांची दिशा असते. त्यामुळे आता शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील ज्या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे ती सत्ता शिवसेनेला गमवावी लागणार आहे.

ठाण्यातील भाजपचा मार्ग होणार सुकर…

एकनाथ शिंदे यांनी जर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर यामुळे ठाण्यात सत्त्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला फायदा होणार असून यामुळे ठाण्यातील भाजपचा सत्त्तेचा मार्ग देखील सुकर होणार आहे. २०१७ साली झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे २४ नगरसेवक निवडणून गेले होते. तर शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडणून गेले होते. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाले तरी ठाण्यात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद सुरूच होते. त्यामुळे भाजप सोबत युतीची भूमिका मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात भाजपचा मार्ग अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत.

नरेश म्हस्के मातोश्रीवर गेलेच नाही…

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मातोश्रीवर शिवसेना आमदारांची आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीला ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना देखील बोलावण्यात आले होते. मात्र नरेश म्हस्के हे मातोश्रीवर गेलेच नसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नरेश म्हस्के देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याची दाट शक्यता आहे. ठाण्याच्या राजकारणात नरेश म्हस्के हे देखील महत्वाची भूमिका बजावत असल्याने ठाण्याच्या राजकारणावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेच्या भूमिकेवर नाराजी..

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मुंबईत शिवसैनिक शिंदे यांच्या भूमिकेच्या विरोधात एकवटले असल्याचे चित्र पाहायला मिळाले . दुसरीकडे शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाण्यात मात्र शिवसैनिकांनी उघडपणे बोलण्यास टाळले. त्यामुळे ठाण्यात शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे हे शिवसेना सोडणार नाहीत ते योग्य भूमिका घेतील अशी अशा सर्वसामान्य शिवसैनिकांना अशा आहे. कल्याण डोंबिवली मधील ज्येष्ठ शिवसैनिक प्रफुल देशमुख यांनी तर थेट ईडीने काडी लावल्यामुळे शिंदे यांनी ही भूमिका घेतली का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीधील शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सर्वच लक्ष लागलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT