Eknath Shinde : आमचे साहेब शिवसेना सोडणार नाहीत; आनंद आश्रमातील शिवसैनिकांना विश्वास | पुढारी

Eknath Shinde : आमचे साहेब शिवसेना सोडणार नाहीत; आनंद आश्रमातील शिवसैनिकांना विश्वास

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: आमचा आमच्या (Eknath Shinde) साहेबांवर विश्वास आहे. ते शिवसेना सोडणार नाही. शिवसेना त्यांच्या रक्तात आहे. भगव्याची आस त्यांच्या हृदयात आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास आनंद आश्रमातील शिवसैनिकांनी व्यक्त केला.

आनंद आश्रम हे ठाण्यातील शिवसेनेचे तसे जन्मस्थान. आनंद दिघे याच आनंद आश्रमात बसून लोकांचे अडचणी सोडवायचे. येथे आनंद दरबार भरायचा. घराघरात शिवसेना पोहोचावी, म्हणून दिघेसाहेब पायाला भिंगरी लावल्या प्रमाणे फिरायचे. त्यांच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेने सोबतच राहतील, असे सांगताना शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. शिवसेनेने पहिली सत्ता आणली ती ठाणे महापालिकेवरच. त्यामुळे ठाणे आणि शिवसेनेचे नाते अतूट आणि घट्ट आहे. त्याच शिवसेनेत एक बंड उभे राहिले तेही ठाण्यातच. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी आपण प्रतारणा करणार नाही. हिंदुत्व हा आपला प्राण आहे, असे सांगत भाजप शिवसेना युती व्हावी, अशी सूचकता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर आनंद आश्रमातील शिवसैनिक शिंदे शिवसेनेत पुन्हा परतील, यासाठी आशावादी आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी महाविकास आघाडीचे ५ आमदार आणि भाजपचे ५ आमदार निवडून आले खरे. मात्र, एका काँग्रेसच्या आमदाराचा पराभव झाला. त्या आधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देखील भाजपनेच बाजी मारली होती. त्यामुळे भाजपवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना विधान परिषदेच्या निकालानंतर अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले.

काल रात्रीपासून अजून शिवसेनेचे मुख्य चेहरा असणारे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे अचानक नॉटरिचेबल झाले. ते नेमके कुठे गेलेत हे कोणालाच ठाऊक नव्हते. मात्र, काही तासांनी ते सुरतमधील एका हॉटेलमध्ये ३५ आमदारांसह मीटिंग घेत आहेत, अशी माहिती मिळाली. विधान परिषद निवडणुकीत त्यांना विचारण्यात आले नसल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button