Latest

काँग्रेस अध्‍यक्ष निवडणूक : खर्गे समर्थकांमुळे शशी थरुर यांना करावा लागला उ.प्रदेश दौरा रद्‍द!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक अवघ्‍या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. या निवडणुकीत मल्‍लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर आमने-सामने आहेत. हे दोन्‍ही नेते विविध राज्‍यांमध्‍ये प्रचार करत मतदानाचे आवाहन करत आहेत. अशातच लखनौमध्‍ये मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थकही येत असल्‍याने संघर्ष टाळण्‍यासाठी पक्षांतील ज्‍येष्‍ठ नेत्याने थरुर यांना  उत्तर प्रदेश दौरा रद्द करण्‍यास सांगितले. त्‍यामुळे थरुर यांना दोन दिवसांमध्‍ये दोनवेळा आपला लखनौ दौरा रद्द करावा लागला, असे वृत्त 'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

'संघर्षा'च्‍या नावाखाली थरुर यांना राेखले

शशी थरुर हे सोमवार १० ऑक्‍टोबर रोजी लखनौ दौरा करणार होते. या दिवशी मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले होते. त्‍यामुळे राज्यात प्रचार करणे योग्य ठर‍णार नाही, असा निरोप ज्‍येष्‍ठ नेत्याने थरुर यांना दिला. तसेच तुम्‍ही मंगळवारी लखनौमध्ये या, असेही सांगण्यात आले. मात्र मंगळवारी लखनौत मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थक आले आहेत. तुम्‍ही येथे आल्‍यास संघर्ष होवू शकतो, असे ज्‍येष्‍ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी थरुर यांना लखनौ दौरा रद्‍द करण्‍यास सांगितले.

काँग्रेस अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये सर्वाधिक मतदान आहे. या राज्‍यात पक्षाचे १२०० हून अधिक प्रतिनिधी आहेत. आता रविवार, १६ ऑक्‍टोबर रोजी थरुर लखनौला भेट देणार आहेत. मात्र त्‍यांना सलग दोनवेळा लखनौ दौरा रद्द करण्यास सांगितल्याने त्‍यांना नेमका उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुखाचा विरोधहोत आहे का, अशी चर्चाही पक्षात रंगली आहे. थरुर यांना लखनौ दौरा रद्‍द करण्‍यास सांगितल्‍याची चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेस अध्‍यक्षपदाची निवडणूक लढविण्‍यास राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांनी नकार दिला होता. आता शशी थरुर आणि पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्‍यात लढत होणार आहे. काही नेते मत देण्‍यासाठी संदेश पाठवत आहेत. याचा परिणाम गुप्‍त मतदान प्रक्रियेवर होवू शकतो, असे थरुर यांनी म्‍हटलं होते. तसेच आपल्‍याला चांगला प्रतिसाद मिळत असून माझी कामगिरीही अपेक्षेपेक्षा चांगली असेल असेही त्‍यांनी म्‍हटलं होतं.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT