Latest

शेकडो बेवारस मुलांचे पालक शंकर बाबा पापळकर स्वीकारणार ‘पद्मश्री’

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; प्रशांत वाघाये : दिनांक ९ मेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यामध्ये गेल्या ३५ वर्षांपासून बेवारस बालकांसाठी कार्यरत असलेले अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या पुर्वसंध्येला शंकरबाबा पापळकर यांनी दिल्ली येथे दै. 'पुढारी'सोबत विशेष संवाद साधला.
"बेवारस मुलांना १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रिमांड होममध्ये ठेवले पाहिजे ही माझी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. १८ वर्षे पूर्ण झाले म्हणजे जगाच्या नजरेत ते सज्ञान झाले असे असले तरी त्यांचे कोणी पालक नसतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शेवटपर्यंत सरकारने रिमांड होममध्ये ठेवण्याची सुविधा करावी, या मागणीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे शंकरबाबा पापळकर हे म्हणाले. ते गेले १५ वर्ष या गोष्टीसाठी लढा देत आहेत.

दरवर्षी एक लाख मतिमंद मुले-मुली रिमांड होममधून अठरा वर्ष झाल्यानंतर बाहेर पडतात. मात्र, ते पुढे कुठे जातात?, काय करतात? याबद्दलची हवी तशी नोंद शासन दरबारी उपलब्ध होत नाही. दरम्यान, माझ्या आश्रमात आजवर आलेली प्रत्येक बेवारस व्यक्ती नोंदणीकृत आहे आणि अगदी पहिल्या व्यक्तीपासून आजतागायत आलेल्या सगळ्यांची माहिती आहे. ती व्यक्ती आज रोजी कुठे आहे?, कशा परिस्थितीत आहेत? याची संपुर्ण नोंद आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

पालक म्हणून शंकर बाबा पापळकर यांचे नाव

सध्या परिस्थितीत शंकरबाबा पापळकर यांच्या अमरावती जिल्ह्यातील वझ्झर आश्रमामध्ये ९८ मुली आणि २५ मुले आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात आले. १९९० मध्ये शंकरबाबांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. अनाथ, अपंग आणि दिव्यांग चिमुकल्यांच्या वेदना स्वस्थ बसू देत नव्हत्या, त्यांचे दुःख बघून त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून हे काम सुरू केले. दरम्यानच्या काळात जवळपास ३० मुलींचे लग्न लावून दिले. १५ मुलांना शासकीय नोकरी मिळाली. अनेक बेवारस दिव्यांग बालकांचे आयुष्य सुकर झाले. या सर्वांच्या आधार कार्डवर, रहिवासी दाखल्यांवर किंवा इतर कागदपत्रांवर पालक म्हणून शंकर बाबा पापळकर यांचे नाव आहे.

'पुढारी' च्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन

पद्मश्री पुरस्कार स्वीकारणे हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यात ज्याप्रमाणे राम मंदिर कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा ऐतिहासिक क्षण होता, त्याचप्रमाणे जर दिव्यांग आणि गतिमंद बालकांना आयुष्याच्या शेवटपर्यंत रिमांड होममध्ये राहू देण्यात यावे, अशा प्रकारचा कायदा केल्यास दिव्यांग- विकलांग यांच्या जीवनासाठी खुप मोठी गोष्ट होईल. तो कायदा म्हणजे, त्या बालकांच्या जीवनाचा उद्धार करणारे एक मंदिर असेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेवारस दिव्यांग- मतिमंद बालकांना आयुष्याच्या शेवटपर्यंत रिमांड होममध्ये राहता यावे, यासंदर्भातला कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी 'पुढारी' च्या माध्यमातून केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' विषयावर तोडगा काढू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच माझ्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच हा कायदा होणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

यांच्यासोबत स्वीकारणार पद्मश्री

पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पुरस्कार प्राप्त लोकांचे नातेवाईक सामान्यता त्यांच्यासोबत असतात. मात्र, शंकरबाबा पापळकर त्यांच्या आश्रमातील मानसपुत्र आणि मानसकन्या असलेले गांधारी आणि योगेश यांच्या समवेत पुरस्कार स्वीकारणार आहेत. ज्यांना बेवारसपणे कोणीतरी टाकून दिले होते ते बालक आज मोठे होऊन राजधानी दिल्लीत माझ्यासोबत आहेत. राष्ट्रपती भवनातला देखणा सोहळा ते अनुभवू शकणार आहेत, ही माझ्या मनाला अत्यंतिक समाधान देणारी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT