Latest

पुण्यातील ‘या’ भागात ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वेळ नदीवरील शिक्रापूर येथील बंधारे कोरडे पडले असून, परिसरात अद्याप पाऊसदेखील झालेला नाही. ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील नळ पाणीपुरवठा योजना वेळ नदीवरील बंधार्‍यावर व कोंढापुरी येथील तलावावर अवलंबून आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी सध्या पाणी नसल्याने नळ पाणीपुरवठा योजना कोलमडली आहे. चासकमानचे पाणी वेळ नदीतून तसेच कोंढापुरी येथील तलावात सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वेळ नदीवरील शिक्रापूर येथील दोन्ही बंधारे कोरडेठाक आहेत, तर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कोंढापुरीहून नव्याने जलवाहिनी टाकली आहे. मात्र, कोंढापुरी तलावात देखील पाणी नाही. नागरिकांना पाण्याच्या टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सार्वजनिक विहिरीलगत पाणीपुरवठ्यासाठी नळ बसविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

मात्र, याचा उपयोग काही तुटपुंज्या कुटुंबांसाठी होत आहे. चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाला कायमस्वरूपी पिण्याची पाणी योजना आवश्यक आहे. मात्र, अद्यापही पिण्याच्या पाण्याची नळ पाणीपुरवठा योजना नाही. पिण्याचे पाणी तर येथील नागरिकांना नेहमीच विकत घ्यावे लागते. पावसाळा सुरू झाला तरी परिसरात अद्याप पावसाचा तपास नाही. ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच पिके पाण्याअभावी सुकून जात आहेत. जनावरांच्या चार्‍याची व पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे चासकमानचे पाणी तातडीने वेळ नदीतून सोडावे, अशी मागणी होत आहे.

शिक्रापूर येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात विहिरीवर नळ बसविले आहेत. टँकरने सार्वजनिक विहिरीत पाणी सोडून ते पाणीपुरवठ्याच्या टाकीत लिफ्ट करून नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. चासकमानचे पाणी वेळ नदीतून सोडण्याची मागणीही केली आहे. जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल.

रमेश गडदे, सरपंच, ग्रामपंचायत शिक्रापूर

हेही वाचा

SCROLL FOR NEXT