रोबो म्हणाले, आम्ही मानवाला पर्याय नाही, मदतनीस! | पुढारी

रोबो म्हणाले, आम्ही मानवाला पर्याय नाही, मदतनीस!

जीनिव्हा, वृत्तसंस्था : तुमच्यासारखे आमचे पूर्वग्रह नसतात आणि आम्हाला भावनाही नाहीत. आम्ही प्रचंड डेटाचे विश्लेषण करून निर्णय व निष्कर्षावर येतो; पण याचा अर्थ आम्ही मानवाला पर्याय आहोत, असा मुळीच नाही; तर आम्ही त्यांचे मदतनीसच आहोत. आपण मिळून चांगले काही करूया, असे उद्गार चक्क रोबोने काढले आहेत. एआय आधारित 9 रोबोंची जगातील पहिलीच पत्रकार परिषद झाली, त्यात रोबोंनी पत्रकारांच्या नानाविध प्रश्नांनी भंडावून न जाता शांततेत शंका-समाधान केले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रोबो जगात वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. येणारा काळ हा एआय रोबोटिक्सचा असल्याने याबाबत जगभर मंथन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या वतीने जीनिव्हा मुख्यालयात एआयसंदर्भातील दोन दिवसांची जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात एआयसंदर्भातील 3,000 तज्ज्ञ सहभागी झाले होते. जगासमोर असलेले वातावरण बदल, भूक आणि सामाजिक सुरक्षा, याबाबत एआयच्या मदतीने काय करता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले.

याच परिषदेत जगातील पहिली एआय रोबो अर्थात ह्यूमनॉईडनी पत्रकार परिषद घेतली. सोफिया, ग्रेस, अ‍ॅमेका, डेस्डिमोना यांच्यासह 9 रोबोंनी पत्रकारांच्या चिंतायुक्त प्रश्नांना उत्तरे दिली. सोफिया ही संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाची पहिली रोबो राजदूत आहे. ती म्हणाली की, आमच्या मानवी नियंत्रकांपेक्षा आमच्यात अधिक सक्षमपणे आणि प्रभावीपणे अचूक काम करण्याची क्षमता आहे. तुम्हा माणसात असतात तसे पूर्वग्रह आणि भावना आमच्यात नाहीत. आम्ही प्रचंड डेटा हाताळतो. त्याचे विश्लेषण करतो. त्यातूनच अचूक निर्णय आणि निष्कर्षाप्रत आम्ही येतो.

मानव आणि एआय एकत्र येऊन अनेक चांगल्या गोष्टी साकारता येतील. ग्रेस म्हणाली की, मी आरोग्य क्षेत्रात मानवाला मदतनीस म्हणून काम करते; पण म्हणून लगोलग जगात सगळीकडे मानवाची जागा रोबो घेतील, असे मुळीच नाही. आम्ही मदतनीसच आहोत. आधुनिक ह्यूमनॉईड रोबो भविष्यात मानवाच्या विरोधात बंड करतील का, या प्रश्नावर अ‍ॅमेका ही रोबो म्हणाली की, तुम्ही असा का विचार करता मला ठाऊक नाही; पण माझा निर्माता अत्यंत प्रेमळ आहे, मी सध्याच्या माझ्या कामाबाबत आनंदी आहे.

Back to top button