Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढून नव्या उच्चांकावर, निफ्टी १९,७०० पार, ‘हे’ शेअर्स तेजीत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीला विराम देण्याची शक्यता आणि आयटी स्टॉक्समधील तेजीच्या जोरावर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) आज नवा उच्चांक नोंदवला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ५५० अंकांनी वाढून ६६,६१६ वर झेप घेतली. तर निफ्टीने पहिल्यांदाच १९,७०० चा टप्पा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स ५२९ अंकांच्या वाढीसह ६६,५८९ वर तर निफ्टी १५५ अंकांनी वाढून १९,७२१ वर बंद झाला. आयटी आणि PSU बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. त्याशिवाय फार्मा स्टॉक्सही तेजीत राहिले. (Stock Market Closing Bell)

ऑटो वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला आणि PSU बँक निर्देशांक २ टक्क्यांनी आणि निफ्टी बँक निर्देशांक १ टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वाढला आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्के वाढला.

'हे' शेअर्स तेजीत

सेन्सेक्स आज ६६,१४८ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ६६,६५६ अंकांपर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर एसबीआय, विप्रो, रिलायन्स, एचडीएफसी बँक, कोटक बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय, मारुती, एशियन पेंट्स, मारुती, ॲक्सिस बँक हे शेअर्स वाढले. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, जेएसडब्लू स्टील, एम अँड एम, टीसीएस हे शेअर्स घसरले.

एचडीएफसी बँक शेअर्सची दमदार कामगिरी

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) चालू आर्थिक वर्षाच्या (FY24) एप्रिल-जून तिमाहीत ११,९५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा नफा ९,१९६ कोटी रुपये होता. त्यात आता वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एचडीएफसी बँकेचा शेअर आज २ टक्के वाढून १,६७८ रुपयांवर पोहोचला. दरम्यान, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेने जागतिक पातळीवर मोठा टप्पा पार केला आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदार असलेल्या या बँकेने सोमवारी १०० अब्ज डॉलर बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या विशेष जागतिक क्लबमध्ये स्थान मिळवले. तसेच सुमारे १५१ अब्ज डॉलर म्हणजेच १२.३८ लाख कोटी बाजार मूल्यावर व्यवहार करत आता एचडीएफसी बँक ही मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) आणि बँक ऑफ चायना (Bank of China) पेक्षा मोठी जगातील सातव्या क्रमांकाची कर्जदार बँक बनली आहे. (Stock Market Closing Bell)

एंजेल वनचे शेअर्स घसरले

भारतीय स्टॉक ब्रोकर फर्म एंजेल वन (Angel One) चे शेअर्स आज ५ टक्क्यांनी घसरले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने या स्टॉक ब्रोकरला सहा महिन्यांसाठी नवीन अधिकृत व्यक्तींना ऑनबोर्डिंग करण्यास मनाई केल्यानंतर आणि विद्यमान लोकांच्या ऑपरेशन्सवर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत दंड ठोठावला आहे. या पार्श्वभूमीवर एंजेल वनचे शेअर्स खाली आले.

दरम्यान, आशियाई बाजारात कमजोरी दिसून आली. शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले होते.

शेअर बाजारातील तेजीची प्रमुख कारणे

  • जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत
  • डॉलरच्या तुलनेत रुपयात सुधारणा
  • परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ कायम
  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीला विराम देण्याची शक्यता
  • हेविवेट स्टॉक्समध्ये गुंतवणूक कायम

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT