HDFC Bank ची जागतिक स्तरावर मोठी झेप! मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ चायनाला टाकले मागे | पुढारी

HDFC Bank ची जागतिक स्तरावर मोठी झेप! मॉर्गन स्टॅनली, बँक ऑफ चायनाला टाकले मागे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांच्या विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेने जागतिक पातळीवर मोठा टप्पा पार केला आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदार असलेल्या या बँकेने सोमवारी १०० अब्ज डॉलर बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांच्या विशेष जागतिक क्लबमध्ये स्थान मिळवले. तसेच सुमारे १५१ अब्ज डॉलर म्हणजेच १२.३८ लाख कोटी बाजार मूल्यावर व्यवहार करत आता एचडीएफसी बँक ही मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) आणि बँक ऑफ चायना (Bank of China) पेक्षा मोठी जगातील सातव्या क्रमांकाची कर्जदार बँक बनली आहे. याबाबतचे वृत्त इकाॅनाॅमिक टाईम्सने दिले आहे.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोन्ही मोठ्या संस्थांमध्ये विलीनीकरण झाले. हा व्यवहार ४० अब्ज डॉलरचा आहे. देशातील कंपन्यांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार आहे. या विलीनीकरणानंतर वित्तीय सेवा देणारी देशातील एक मोठी कंपनी समोर आली.

HDFC बँक ही जेपी मॉर्गन (४३८ अब्ज डॉलर), बँक ऑफ अमेरिका (२३२ अब्ज डॉलर), चीनची आयसीबीसी (२२४ अब्ज डॉलर), ॲग्रीकल्चरल बँक ऑफ चायना (१७१ अब्ज डॉलर), वेल्स फार्गो (१६३ अब्ज डॉलर) आणि HSBC (१६० अब्ज डॉलर) च्या मागे आहे.

HDFC बँकेचे बाजार भांडवल जागतिक गुंतवणूक संस्था मॉर्गन स्टॅनले (१४३ अब्ज डॉलर) आणि गोल्डमन सॅक्स (१०८ अब्ज डॉलर) पेक्षा अधिक झाले आहे.

दोन्हींच्या विलीनीकरणानंतर एका एचडीएफसी भागधारकाला त्याच्याकडील २५ शेअर्ससाठी एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स मिळाले आहेत. एका अर्थाने सध्याच्या एचडीएफसीच्या भागधारकांकडे एचडीएफसी बँकेची ४१ टक्के मालकी आली आहे. शुक्रवारी, बँकेने सर्व-स्टॉक विलीनीकरण कराराचा भाग म्हणून एचडीएफसी लिमिटेडच्या पात्र भागधारकांना प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्याचे ३,११,०३,९६,४९२ नवीन इक्विटी शेअर्सचे वाटप केले. त्यानुसार बँकेचे पेड-अप शेअर कॅपिटल ५,५९,१७,९८,८०६ शेअर्सवरून ७,५३,७५,६९,४६४ शेअर्सपर्यंत वाढले. आज सोमवारच्या व्यवहारात एचडीएफसी बँकेचा शेअर ०.३१ टक्के वाढून १,६५० रुपयांवर व्यवहार करत होता.

HDFC Bank तिसरी सर्वात मोठी भारतीय कंपनी

BSE वरील बाजार मूल्याच्या बाबतीत HDFC बँक ही रिलायन्स इंडस्ट्रीज (१८.६ लाख कोटी रुपये) आणि टीसीएस (१२.९ लाख कोटी रुपये) नंतर तिसरी सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. तर ICICI बँक ही भारतात चौथ्या स्थानावर आहे आणि जगातील टॉप कर्जदार बँकांच्या यादीत १९ व्या स्थानी आहे. या बँकेचे बाजार भांडवल ८२ अब्ज डॉलर म्हणजेच ६.६८ लाख कोटी आहे.

बाजार मूल्यानुसार जगातील सर्वात मोठ्या बँका

बँक- बाजार भांडवल (अब्ज डॉलरमध्ये)

जेपी मॉर्गन चेस- ४३८
बँक ऑफ अमेरिका- २३२
आयसीबीसी- २२४
ॲग्रीकल्चरल बँक ऑफ चायना- १७१
वेल्स फार्गो- १६३
एचएसबीसी- १६०
एचडीएफसी बँक-१५१
मॉर्गन स्टॅनली- १४३
चायना कन्स्ट्रक्शन बँक-१४१
बँक ऑफ चायना-१३८

हे ही वाचा :

Back to top button