बाजाराची उसळी

बाजाराची उसळी

अमेरिकेतील महागाईची झळ कमी होऊ लागली, फ्रेड रिझर्व्हची व्याज दर वाढवण्याची मोहीम खंडित होण्याची चिन्हे दिसू लागली आणि अमेरिकन बाजारात उत्साह संचारला. आठवड्यात (Nasdaq) हा निर्देशांक 3.64 टक्क्यांनी वाढला आणि इकडे भारतात निफ्टी IT इंडेक्सही 3.83 टक्क्यांनी वाढला. भारतातील (IT Giant) टीसीएसचे अपेक्षेपेक्षा चांगले निकाल आणि सोबत विप्रो आणि एचसीएल रेकनेही सादर केलेले समाधानकारक निकाल यामुळे सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी बाजारात 'धूम मची है' असा माहौल होता.

बाजाराने सर्वकालीन 66000 चा टप्पा शुक्रवारी पार केला. गत तीन महिन्यात इंडेक्स मध्ये 6150 अंशाने व गत एका महिन्यात 2815 अंश अशी मोठ्या प्रमाणात वाढ दर्शविली. इंडेक्सची वाटचाल 70000 कडे आहे काय, हे येणार्‍या काळात समजेल.

भारतीय बाजाराची दिशा ठरविणारे आणि फिरविणारे जे महारथी स्टॉक्स आहेत. त्यामध्ये रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस यांचा समावेश होतो. टीसीएस सप्ताहात 5.77 टक्के वाढला. 3514.65 वर तो बंद झाला आणि त्याचा 52 Week High आहे 3575. तो येणार्‍या सप्ताहातच पार व्हायला हरकत नाही आणि 4000 चा टप्पाही टीसीएस लीलया पार करेल. इन्फोसिस, एफॅसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, एलटीटीएस या (Nifty IT Index) मधील झाडून सार्‍या स्टॉक्सनी गत सप्ताहात दमदार फलंदाजी केली.

ऑनलाइन गेमिंगचा बिझनेस करणारी डेल्स कॉर्प ही कंपनी आठवड्यात अठ्ठावीस टक्क्यांनी कोसळली. रु. 184 वर बंद झालेला तिचा शेअर रु. 150 पर्यंत खाली घसरेल असे जाणकारांचे मत आहे. जीएसटी कॉन्सिलने ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी बसवल्याचा हा परिणाम! अगोदरच या व्यवसायावर 30 टक्के टीडीएस लागू होतो. पन्नास टक्क्यांहून अधिक रक्कम करस्वरूपात सरकारला द्यावी लागली तर कंपनी आपली बॅलन्स शीट कशी सुधारणार आहे?

मागील सोमवारी लिहिल्याप्रमाणे ओलक्ट्रा आणि माझगाव डॉक या शेअर्सची तुफानी घोडदौड सुरू आहे. या आठवड्यातही हे शेअर्स अनुक्रमे 31.53 टक्के आणि 26.79 टक्के वाढले. काही शेअर्सनीच जर ठरवले तर ते गुंतवणूकदारांना कसे मालामाल करून टाकतात बघा. गेल्या तीन महिन्यांत या दोन शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पटीपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आठवड्यात जवळपास 4% नी वाढून 2740.70 वर बंद झाला. 2802 हा त्याचा 52 Week High आहे. तो पार करून लवकरच रिलायन्स 3000 वर पोहोचेल. कंपनीने अधिग्रहीत केलेली Financial Services ची शाखा Demerge करून Jio Financial Servicesया नावाने नवीन कंपनीचे कामकाज सुरू होईल. इन्श्युरन्स, पेमेंटस्, डिजिटल ब्रोकिंग, अ‍ॅसेज मॅनेजमेंट आदी क्षेत्रात तिचा संचार असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर होल्डर्सना प्रत्येकी एका शेअरमागे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा एक शेअर मिळेल.

टाटा मोटर्स सप्ताहात 4 टक्के, तर टाटा स्टीलही तेवढाच वाढला. जग्वार लँड रोव्हरला वाढलेली मागणी तसेच कमर्शिअल ट्रक्सच्या विक्रीतील वाढीमुळे टाटा मोटर्स वाढत आहे. शुक्रवारी तो रु. 624.90 वर बंद झाला. 52 Week High 634.80 आहे. 700 रु.च्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.

NSE चा Nifty Next 50 हा एक इंडेक्स आहे. मार्केट कॅपनुसार प्रथम 100 कंपन्या या लार्ज कॅप कंपन्या असल्यामुळे निफ्टी नेक्स्ट 50 मधील कंपन्याही लार्ज कॅप आहेत. बाजार जेव्हा Bullish Phase मध्ये असतो तेव्हा लार्ज कॅप कंपन्यांमध्ये आवर्जून गुंतवणूक करावी आणि त्यातही विशेषतः Nifty Next 50 इंडेक्समधील कंपन्यांमध्ये करावी कारण या कंपन्याही भविष्यात Nifty 50 चा भाग होणार असल्याने त्यांच्यामध्ये Growth Potential असते आणि Expiry Adjustments मुळे निफ्टी 50 च्या कंपन्यांमध्ये जे Fluctuation असते, ते इकडे कमी असते. नायका, झोमॅटो या मागली नजीकच्या काळात सूचिबद्ध झालेल्या कंपन्या याच इंडेक्सचा भाग आहेत.

बर्जर पेंटस् हा या इंडेक्समधील एक अतिशय Promising शेअर आहे. रु. 668 हा त्याचा शुक्रवारचा बंद भाव आहे. मार्केट शेअरच्या बाबतीत तो एशियन पेंटस्च्या खालोखाल आहे. रिअ‍ॅल्टी सेक्टर जेव्हा प्रगतिपथावर असते तेव्हा पेंटस् शेअर्सनासुद्धा मागणी वाढते. त्या द़ृष्टीने हा शेअर सध्या गुंतवणूक योग्य आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news