नोकरदारांसाठी ‘आयटीआर-1 सहज’ का गरजेचा? | पुढारी

नोकरदारांसाठी ‘आयटीआर-1 सहज’ का गरजेचा?

प्राप्तिकर विवरण दाखल करण्यासाठी ‘आयटीआर-1 सहज’चा सर्वाधिक वापर होतो. आयटीआर भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. अनेकदा प्राप्तिकर खात्याकडून ही डेडलाइन वाढविली जाते. वेतनातून, लाभांशातून, व्याजातून उत्पन्न होते अशा मंडळींनी ‘आयटीआर-1’ सहजचा वापर करायला हवा. त्याचवेळी उत्पन्न करकक्षेत येत नसले म्हणजेच शून्य कर असला तरी आयटीआर भरणे महत्त्वाचे ठरते. आयटीआर भरल्याने अनेक फायदे मिळू शकतात.

‘आयटीआर-1 सहज’ हा एक रिटर्न भरण्याचा अर्ज आहे. ज्यांचे उत्पन्न वेतन, पेन्शन आणि व्याजातून होत असते, अशी नोकरदार मंडळी या अर्जाचा वापर करतात. प्राप्तिकर विवरण दाखल करण्यासाठी याच अर्जाचा सर्वाधिक वापर होतो. ज्यांचे उत्पन्न करसवलतीच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यांनी तर आयटीआर भरणे अनिवार्य आहे. सध्या सवलतीची मर्यादा अडीच लाख आहे.

आयटीआर कशासाठी गरजेचे?

आयटीआर भरणे ही एक आर्थिक शिस्तीचा भाग असून तो भरणे अनिवार्य आहे. या माध्यमातून करदाता प्राप्तिकर खात्याला आपले उत्पन्न आणि कर याचे विवरण सादर करत असतो. 1961 नुसार आयटीआर दाखल करणे गरजेचे असून ते कायदेशीरित्या बंधनकारक आहे.

‘आयटीआर सहज-1’चा कोण वापर करू शकतो

‘आयटीआर-1’चा वापर करण्यासाठी एका आर्थिक वर्षात करदात्याचे एकूण उत्पन्न हे 50 लाखांपेक्षा अधिक असू नये. करदात्याचा उत्पन्नाचा स्रोत – वेतन, घर मालमत्ता, लाभांश, फॅमिली पेन्शन किंवा शेती (5 हजारांपर्यंत उत्पन्न) असणे गरजेचे आहे. याशिवाय बचत खात्याचे व्याज, बँक किंवा पोस्ट ऑफिस डिपॉझिटवरचे व्याज या रूपातून ज्यांना उत्पन्न मिळते तेव्हा याच अर्जाचा वापर केला जातो.

आयटीआर फायलिंगसाठी काय गरजेचे?

करदाता नोकरी करत असेल तर त्यासाठी त्याला फॉर्म 16 आवश्यक आहे. एखादा व्यक्ती ज्या कंपनीत काम करत असेल, तर त्या कंपनीतील लेखा विभाग हा फॉर्म 16 जारी करतो. साधारणपणे बहुतांश कंपन्या या तारखेपूर्वीच फॉर्म 16 जारी करतात.

शेवटच्या तारखेपर्यंत थांबावे का?

कोरोना काळात प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरण भरण्याची डेडलाइन वाढविली होती. करदात्यासाठी वेळेच्या आतच प्राप्तिकर विवरण भरणे फायदेशीर राहू शकते. त्याने डेडलाइन किंवा शेवटची तारीख याची वाट पाहू नये.

विधिषा देशपांडे

Back to top button