Latest

सांगली : आरफळ कॅनॉलमध्ये दोन मुली बुडाल्या

backup backup

मांजर्डे : पुढारी वृत्तसेवा विसापूर (ता.तासगाव) येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आरफळ कॅनॉलमध्ये बुडाल्या. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला, तर दुसरी अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवार, दि.26 रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली. यामध्ये आरोही विक्रम गुजले (वय 4 वर्षे, रा. बांबवडे, ता. पलूस) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गा कुमार मदने (वय 18, रा. वासुंबे) ही अद्याप बेपत्ता आहे. या घटनेची माहिती पोलिसपाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसांत दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः विसापूर येथील जुन्या बामणी रोडजवळ बेरडकी मळ्यात पद्मा कुमार मदने (मूळ गाव वासुंबे, सध्या रा. विसापूर) या राहतात. दुपारी एकच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील आरोही व दुर्गा या घराजवळून जात असणार्‍या आरफळ कॅनॉलमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुताना अचानक आरोही कॅनालच्या पाण्यामध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने कॅनॉलमध्ये उडी मारली. मात्र, दुर्दैवाने दोघी पाण्याबरोबर वाहून गेल्या. यापैकी आरोही ही घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर मृतावस्थेत सापडली, तर दुर्गा अद्याप बेपत्ता आहे. आरोही ही आपल्या नातेवाईकांकडे आली होती.

घटनास्थळाशेजारी शेतात काम करत असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ शोधमोहीम सुरू केली. त्यांना आरोही घटनास्थळापासून 1 किमी अंतरावर सापडली.तिला तात्काळ बाहेर काढले असता पाण्यामध्ये बुडाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.गावातील चाळीस ते पन्नास तरुणांनी गावापासून पाच ते सहा किलोमीटर परिसरातील आरफळ कॅनॉलमध्ये शोध घेतला.मात्र रात्री उशिरापर्यंत दुर्गा सापडली नाही.संध्याकाळ झाल्यामुळे बचाव कामात अडथळे आले.

आरफळचे शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. कॅनॉल दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दुसर्‍या मुलीला शोधून काढणे अवघड बनले आहे. घटनेची माहिती मिळताच सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक केराम व पोलीस उपनिरीक्षक तारडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली व तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस नाईक विजय घस्ते व पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय जाधव अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT