मुंबई : श्रीमंत तिरुपतीला 40 हजार 400 रुपयांत दिला सिडकोचा 11 एकर भूखंड | पुढारी

मुंबई : श्रीमंत तिरुपतीला 40 हजार 400 रुपयांत दिला सिडकोचा 11 एकर भूखंड

मुंबई ; नरेश कदम : धार्मिक संस्थांना भूखंड देण्यासाठी सिडकोने निश्‍चित केलेला दर डावलून श्रीमंत तिरुपती संस्थानला तब्बल 11 एकरचा भूखंड फक्‍त 1 रुपया चौरस मीटर दराने दिल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय एकाच वेळी सिडकोला आणि सरकारलाही अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतील उलवे नोडमधील या 11 एकर जागेसाठी फक्‍त 40,400 रुपये आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. नवी मुंबईतील उलवे नोड येथे तिरुमला येथील तिरुपती व्यंकटेश्वराचे मंदिराचे प्रतिरुप या जागेवर उभारले जाणार आहे. तिरुमला तिरुपती या देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाला हा स्वस्त भूखंड विशेष प्रकल्पांतर्गत देताना राज्य मंत्रिमंडळाने सिडकोचे नियम वाकवले.

एक तर धार्मिक संस्थानसाठी सिडकोकडे मुबलक भूखंड उपलब्ध असतात असे नाही. त्यातही मंदिर, मशिद आदी धार्मिक स्थळांना जमीन देण्याबाबत सिडकोचे धोरण ठरलेले आहे. पण सिडकोचे अन्य बाबीसाठी जे जमीन वाटपाचे दर आहेत त्या तुलनेत कमी दर धार्मिक स्थळांसाठी जमीन देताना आकारण्यात येतात. पण तो दर चौ. मीटरमागे एक रुपया इतका कमी नक्‍कीच नाही. तिरुमला देवस्थानने सिडकोकडे 35 एकर जागेची मागणी केली होती. परंतु अकरा एकर जागा देण्याचे सिडकोने मान्य केले. त्यासाठीही मंत्रालयातून शिवसेनेच्या मंत्र्यांचा दबाव होता.

मंत्रालयातून दबाव

इतक्या मोठ्या प्रमाणात आतापर्यंत कोणत्याही देवस्थानला सिडकोने जागा दिलेली नाही. त्यामुळे 35 एकर जागा देता येणार नाही, असे सिडकोने स्पष्ट केले होते. परंतु सगळी सूत्रे मंत्रालयातून हलविण्यात आली. प्रतिचौरस मीटरला एक रुपया दर आकारण्याची देवस्थानची मागणी सिडकोने फेटाळली होती. राज्य सरकारने यात निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव सिडकोने राज्य सरकारला पाठवला. राज्य मंत्रिमंडळाने खास बाब म्हणून चौरस मीटरला अवघा एक रुपया दर लावला. त्यामुळे 40,400 चौ. मीटर म्हणजे सुमारे अकरा एकर जागेसाठी केवळ 40 हजार 400 रुपये आकारण्यात आले.

शहर पातळीवरील सुविधा (सिटी लेवल फॅसिलिटी) म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत श्री व्यंकटेश्वराचे मंदिर उभारणीसाठी उलवे नोडमधील सेक्टर-12, भूखंड क्र.3 येथे जमीन देण्यात आली आहे. त्यानुसार उलवे नोडमधील सेक्टर-12, भूखंड क्र.3 (एकूण क्षेत्र 40,400 चौ.मी.) एक चटईक्षेत्र निर्देशांकासह एक रुपया प्रतिचौरस मीटर या नाममात्र दराने ही जमीन दिली, असा दावा सरकारने केला आहे.

अन्य देवस्थानांचे काय?

अशा पद्धतीने खास बाब म्हणून फक्‍त एक रुपया दराने सिडकोची जागा दिली तर देशातील अन्य देवस्थानांकडूनही अशाच स्वस्त दरात जागेची मागणी सिडकोकडे होईल. हा धोका लक्षात घेऊन सिडकोच्या जागा वाटपाच्या धोरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करू नये, असे नगरविकास आणि महसूल अधिकार्‍यांचे मत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. त्यामुळे या देवस्थानने सिडकोच्या धार्मिक स्थळांसठी जो दर लावला जातो त्या दरात जमीन घ्यायला हवी होती. पण या देवस्थानसाठी राज्य सरकारने खास बाब केल्यामुळे देशातील अन्य देवस्थान ही जागेची मागणी करतील. तसेच अकरा एकर जागा रुग्णालयालाही दिली जात नाही, असे नगरविकास विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

विलासरावांचा दाखला

यापूर्वी विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना सत्य साई बाबा यांच्या संस्थेला नवी मुंबईत जागा देण्याचा प्रस्ताव होता. परंतु सदर निर्णय वादग्रस्त ठरेल, म्हणून ही जागा तेव्हा देण्यात आली नाही. अधिकार्‍यांनीही इतक्या कमी दरात जागा देऊ नये, अशी शिफारस देशमुख यांना केली होती. आता मात्र सिडकोने फेटाळलेल्या दरामध्ये तिरुमला देवस्थानाला 40 हजार 400 रुपयात अकरा एकर जागा देण्यात आली.

Back to top button