तीन दिवसांत जमीन मूल्यांकन पूर्ण करा : जिल्हाधिकारी | पुढारी

तीन दिवसांत जमीन मूल्यांकन पूर्ण करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणार्‍या अतिरिक्त 64 एकर जागेच्या मूल्यांकनाचे काम तीन दिवसांत पूर्ण करा, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. याप्रश्नी पुन्हा शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 एकर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. या संपादन प्रक्रियेला आणि विस्तारीकरणाला गती देण्यासाठी यापुढे दर सोमवारी आढावा बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि. 25) पहिली बैठक झाली. बैठकीत संपादित केल्या जाणार्‍या जमिनीच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

विमानतळाला करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्याचा अंदाजपत्रक आणि आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला यावेळी देण्यात आले. संपादित होणार्‍या जमिनीवर सात औद्योगिक मिळकती आहेत. यापैकी दोन मिळकतींचे फेर मूल्यांकन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ द्या आणि ही प्रक्रिया लवकर पूर्ण करा, असेही रेखावार यांनी सांगितले. दरम्यान उद्या बुधवारपासून मुडशिंगी येथील एचटी लाईन स्थलांतरीत करण्याचे काम सुरू होईल, असे महापारेषणच्या वतीने बैठकीत सांगितले.

बैठकीला करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अभिजित धामणे, उप विभागीय कृषी अधिकारी जे. एम. पांगरे, एमआयडीचे उपरचनाकार अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Back to top button