Latest

सांगली : वाळवा तालुक्यात ८८ गावांत निवडणुकीचे धुमशान; राष्ट्रवादी-भाजपमध्ये रंगणार सामना

मोहन कारंडे

इस्लामपूर; मारुती पाटील : ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने वाळवा तालुक्यात राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये प्रामुख्याने लढत पहायला मिळणार आहे. थेट सरपंच निवडीने निवडणुकीत कमालीची चुरस पहायला मिळणार आहे. महिला आरक्षणामुळे ८८ पैकी निम्म्या गावांमध्ये महिलाराज येणार आहे. खुल्या गटातील सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी गावोगावी चुरस असणार आहेच, पण राखीव जागांवर उमेदवार शोधताना मात्र अनेक राजकीय गटांना धावाधाव करावी लागणार आहे.

तालुक्यातील बहुतांश गावात सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्यात भाजपनेही ताकद वाढविली आहे. त्यामुळे अनेक गावांत राष्ट्रवादी व भाजपमध्ये काट्याची लढत पहायला मिळणार आहे. काँग्रेस, शिवसेना पक्षाचे तसेच हुतात्मा गटाचेही काही गावांत प्राबल्य आहे. आपआपल्या गावावरील वर्चस्व अबाधीत ठेवण्यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महिनाभरापुर्वी तालुक्यातील गावांचा दौरा करत कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. स्थानिक पातळीवरील मतभेत बाजूला ठेवून ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणण्याचा कानमंत्रही त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला.

ग्रामपंचायत निवडणुका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहेत. त्यामुळे भाजपचे राहुल महाडीक, सम्राट महाडीक, निशिकांत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ  खोत, हुतात्मा गटाचे वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेने जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, शिंदे गटाचे आनंदराव पवार आदी सर्व राष्ट्रवादीविरोधी नेते या निवडणूकीत ताकद आजमावन्याचा प्रयत्न करणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका या पक्षपातळीवर लढल्या जात नसल्यातरी या निवडणुकांच्या माध्यमातून गावातील राजकीय पक्षांचे प्राबल्य दिसून येत असते. बहुतांश गावात राष्ट्रवादीचे अनेक गट कार्यरत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादीतच लढत पहायला मिळणार आहेत. तर काही गावांतून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सोयीच्या स्थानिक आघाड्या उदयाला येणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता गावोगावी निवडणुकांची मोर्चेबांधणी, आघाड्यांसाठी बैठकांचे सत्र, उमेदवारांचा शोध तसेच  लोकांच्या गाठीभेटीवर स्थानिक पुढाऱ्यांनी भर दिल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT