Latest

काय म्हणता, काळा भात! शेतकऱ्याने घेतले ७० पोती उत्पन्न

स्वालिया न. शिकलगार

पिंपळनेर (नाशिक) : अंबादास बेनुस्कर

'काळा भात' कधी खाल्ला का? खाऊन बघा.. आरोग्यासाठी फायदेशीर… साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पिकतो प्रसिद्ध 'काळा भात'! साक्री तालुक्यातील शेतकरी नेहमीच उत्पन्नवाढीसाठी विविध प्रयोग करताना दिसतो.असाच प्रयोग साक्री तालुक्यातील देवळीपाडा येथील शेतकरी आनंदा सूर्यवंशी यांनी केला आहे. त्‍यांनी तब्बल ७० पोती काळा भाताचा वाण त्यांनी आपल्या शेतात पिकविला आहे. या काळ्या भाताची सध्या परिसरात चर्चा आहे.

काळा भाताच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग टाळता येऊ शकतो. शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील कमी करता येऊ शकते. असा हा बहुपयोगी भात पिकवण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. या पिकाचे एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पन्न येते. जे नियमित भात पिकापेक्षा कमी आहे. मात्र,या भाताला भाव नियमित मागणी असलेल्या भातापेक्षा चार ते पाचपट अधिक मिळतो. अशा या बहुपयोगी भाताचे उत्पन्न साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकरी घेऊ लागला आहे.

कृषी क्षेत्रातील हा नावीन्यपूर्ण बदल येत्या काही दिवसांत नक्कीच परिवर्तनाचा भाग बनेल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या काळात काळ्या तांदळाविषयी अनेक गैरसमज होते. इतकेच नव्हे तर बऱ्याच लोकांना असे वाटले,की काळा तांदूळ आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण बरेच लोक त्याचा नियमित वापर करतात.

बियाण्यासाठी शोधकार्य

आनंदा सूर्यवंशी यांनी सांगितले की,  शेतात काहीतरी नवीन करावेसे वाटले. त्या अनुषंगाने यू-ट्यूबवर शेतात पिकणारे नवीन वाण पाहू लागलो. माझ्या मनात दोन विषय आले. एक म्हणजे काळा भात व दुसरी काळी हळद. मी काळ्या भातचा विषय निवडला. त्यासाठी पंजाबामध्ये बिजवाई (बियाणे) साठी फोन केला. यानंतर त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील शेतकरी राजाराम पाटील यांच्‍याशी पर्क साधून दहा किलो काळा भाताचे बिजवाई आणले. त्याचे रोप तयार करून तीन एकरात लागवड केली. यातून ७० पोती (साळ) काळा भात पिकविला. येणाऱ्या काळात आयुर्वेदिक काळी हळदीच्या बिजवाईचा शोध सुरू असून, या हळदीचीही लागवड करणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी दै.'पुढारी'शी बोलताना सांगितले.

किंमतही तुलनेने कमी

मोठ्या शहरांमध्ये काळा भात विविध कंपन्यांकडून ऑनलाइन ३९९ रुपये प्रतिकिलोने विकला जातो. मात्र, आनंदा सूर्यवंशी यांनीहा भात शेणखत टाकून तसेच कमी फवारणी करून पिकविला. ते २०० रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ स्वरूपात विकणार आहेत. त्‍यांनी काळा भाताबरोबरच १०० पोती बासमती भातही पिकवला आहे.

हेही वाचलं का? 

काळा भात या नवीन वाणाच्या लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी सी. के.ठाकरे व त्यांच्या टीमचे मोलाचे मार्गदर्शन,सहकार्य लाभले. घोडदे येथील कृषी सहाय्यक अंजना चौरे यांनी देखील वेळोवेळी शेतावर भेटी देऊन मार्गदर्शन केले. यांच्या सहकार्यामुळेच मी काळा भाताचे विक्रमी उत्पादन घेऊ शकलो

आनंदा सूर्यवंशी,शेतकरी, देवळीपाडा ( ता.साक्री )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT