पुढारी ऑनलाईन डेस्क : (monkey vs Dog) बीड जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली. या घटनेमुळे हे गाव जगभरात पोहचलं आहे. जगभरातील सगळ्या माध्यमांनी ही बातमी केली आहे. बीड जिल्ह्यातील या गावात २५० कुत्र्यांच्या पिलांची हत्या दोन वानरांनी केल्याची घटना समोर आली आहे. यात काल दोन वानरांना पकडण्यात आले आहे. या वानरांना जवळच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांनाही वानरांनी उचलून घेतल्याने गावात घबराट पसरली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी धारूर वनविभागाकडे धाव घेतली. या वानरांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी माजलगाव येथील सीताराम नायबल नावाच्या गावकऱ्याने घराच्या छतावरून उडी मारली होती. यात ते जखमी झाले. सीताराम नायबल यांच्यावर उपचारासाठी आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाले आहेत, तरीही त्यांना नीट चालता येत नाही. (monkey vs Dog)
बीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कंद यांनी सांगितले की, "कुत्र्यांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूर वनविभागाच्या पथकाने बीडमध्ये पकडले आहे. दोन्ही माकडांना जवळच्या जंगलात सोडण्यासाठी नागपूरला हलवण्यात येत आहे."
माजलगाव तालुक्यातील लवूळ येथे मागच्या एक महिन्यापासून वानरांनी धुमाकूळ घातला आहे. परिसरातील कुत्र्यांची पिल्ले उचलून नेत वानरे त्यांना झाड व इमारतीवरून खाली फेकून देतात. महिनाभरात अनेक कुत्र्यांची पिल्ले या वानरांनी मारून टाकली आहेत. काही ग्रामस्थांवर देखील वानरांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
लवूळ परिसरात महिनाभरापूर्वी कुत्र्यांनी वानराचे एक पिल्लू मारल्याचा प्रकार घडला होता. तेव्हापासून वानर कुत्र्यांची पिल्ले शोधून त्यांना उचलून नेत आहेत. उचलून नेलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना ते उंचावरून फेकून देतात. उंचावरून फेकल्यामुळे आजपर्यत दोनशेपेक्षा जास्त कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही व्यक्तींवर देखील वानरांनी हल्ला केला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सीताराम नायबळ यांच्या कुत्र्याdच्या पिलाला वानराने उचलून घराच्या गच्चीवर नेले. यावेळी नायबळ पिल्लाला सोडवण्यासाठी गच्चीवर गेले असता वानराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पळून जात असताना नायबळ गच्चीवरून खाली पडले. यात त्यांचा पाय मोडला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.(monkey vs Dog)
हेही वाचलत का?