Latest

SA vs IND : द. आफ्रिका दौर्‍यात विराट कोहलीसमोर असतील ‘ही’ पाच आव्हाने

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

भारतीय क्रिकेट संघाच्‍या दक्षिण आफ्रिका दौर्‍याकडे ( SA vs IND : )  सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली या मागील काही दिवसांमध्‍ये घडलेल्‍या विविध घडामोडींमुळे चर्चेत आहे. भारताने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्‍या जमीनीवर कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्‍यामुळेच विराटसमोर ही मालिका जिंकणे हेच मोठे आव्हान असणार आहे. एक कर्णधार आणि फलंदाज या दोन्‍ही आघाड्यावर त्‍याला लढावे लागणार आहे. जाणून घेवूया या दौर्‍यात विराट कोहलीसमोर असणारी पाच आव्हाने…

SA vs IND : बीसीसीआयसोबत असणारे 'मतभेद'ला झुगारावे लागतील

मागील काही दिवस विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) यांच्‍यामधील मतभेद चव्‍हाट्यावर आले आहेत. सर्व प्रथम विराटला टी-२० संघाच्‍या कर्णधार पदावरुन हटविण्‍यात आले. यानंतर त्‍याला वनडे संघाचे कर्णधारपदही सोडावे लागले. यासंदर्भात विराटने पत्रकार परिषद घेवून थेट 'बीसीसीआय' अध्‍यक्ष सौरभ गांगुली यांच्‍यावरच हल्‍लाबोल केला. त्‍यामुळे मागील काही दिवस विराट आणि बीसीसीआयमधील सुप्‍त तणाव सर्वांनाच दिसत आहे. याचा परिणाम त्‍याचा खेळावर होणार का, असा सवाल उपस्‍थित होत आहे. तसेच या घडामोडींचा परिणाम संपूर्ण संघावरही होवू शकतो. सध्‍या विराट हा मुक्‍तपणे सराव करत आहे. त्‍याचा अधिक मोकळेपणा हा स्‍वत:वरील तणाव कमी करण्‍याचा प्रयत्‍न तर नाही ना, अशीही शंका विश्‍लेषकांकडून व्‍यक्‍त केली जात आहे. आता खर्‍या अर्थाने तणावाचे चॅलेंज स्‍वीकारत विराट स्‍वत:ची प्रतीभा दाखवणार का, या प्रश्‍नाचे उत्तर २६ ते २९ डिसेंबर या काळातच मिळणार आहे.

 फलंदाजी सुधारत संघाचे नेतृत्त्‍वही करण्‍याचे चॅलेंज

विराट कोहलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद कायम आहे. मात्र मागील तब्‍बल १० कसोटी सामन्‍यांमध्‍ये त्‍याची बॅट तळपलेली नाही. मागील १० कसोटी सामन्‍यांमध्‍ये त्‍याची धावांची सरासरी २८.४१ इतकीच आहे. त्‍यामुळेच आता त्‍याच्‍यासमोरफलंदाजी सुधारत संघाचे नेतृत्‍व यशस्‍वी करण्‍याचे चॅलेंज आहे. शतकांचे 'मशीन' असेही विराट कोहलीला संबोधले जाते. मात्र यावर्षी त्‍याच्‍या नावावर एकही शतक नाही. आता यावर्षांची सांगता होताना किमान एक शतक झळकविण्‍याची संधी त्‍याला मिळाली आहे. तो संधीचे सोने करणार का, हे पहिल्‍या कसोटीतच स्‍पष्‍ट होईल.

दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकत इतिहास घडविणार ?

भारतीय क्रिकेट संघाने १९९२मध्‍ये दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता ही मालिका भारतीय संघाने जिंकली तर ही ऐतिहासिक कामगिरी विराटच्‍या नावावर नोंदवली जाणार आहे. विराटच्‍या नेतृत्‍वाखालील संघ हे चॅलेंज पूर्ण करणार का, हे पुढील महिन्‍यात स्‍पष्‍ट होईल.

संघ निवड करण्‍याचे स्वातंत्र्य कायम ठेवणे

मागील काही वर्ष विराट कोहली हा संघ निवडीत स्‍वत:च्‍या मतांबाबत किती आगृही असतो हे सर्वांनीच पाहिले आहे. मात्र मागील काही दिवसांमध्‍ये सर्व काही झपाट्याने बदललं. आता तर अशी वेळ आली आहे की, संघातील खेळाडू आर. अश्‍विन याने अप्रत्‍यक्षपणे विराट कोहलीवर निशाणा साधला. उपकर्णधार अजिंक्‍य राहणे याचा फलंदाजी क्रम ठरवणे तसेच मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्‍याबरोबर योग्‍य समन्‍वय ठेवत संघ निवड करणे अशी आव्‍हाने विराटसमोर असतील.

संघातील खेळाडूंबरोबर समन्‍वय ठेवणे

टी -२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद गमावल्‍यामुळे विराटची संघावर पूर्वीसारखे वर्चस्‍व राहणार नाही, असे मानले जात आहे. विराट आता केवळ कसोटी संघाचाच कर्णधारआहे. त्‍यामुळेच अप्रत्‍यक्ष का होईना काही खेळाडू त्‍याच्‍याविरोधात बोलत आहेत. आर. अश्‍विनने नुकतीच एका मुलाखतीमध्‍ये विराटवर अप्रत्‍यक्षपणे टीका केली होती. आता संघातील सर्व खेळाडूंशी समन्‍वय राखत दक्षिण आफ्रिका दौर्‍यातील कसोटी मालिका जिंकणे हेच विराटसमोरील चॅलेज असणार आहे.

सर्वात यशस्‍वी कर्णधारांपैकी एक अशी विराटची क्रिकेट जगतामध्‍ये ओळख आहे. त्‍यामुळे आजपर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावत निश्‍चितच विराट कसोटी मालिकेत भारताला यश देईल, असा विश्‍वास त्‍याचे फॅन व्‍यक्‍त करत आहेत. उत्‍कृष्‍ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका जिंकून दाखविल्‍यास 'विराट' नेतृत्‍वार शिक्‍कामोर्तब होणार आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT