Latest

Russia Ukraine war : रशिया-युक्रेनमध्ये चर्चेची तयारी; रशियानं आक्रमणाची तीव्रता केली कमी

दीपक दि. भांदिगरे

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशियाने आक्रमक भूमिका घेऊन युक्रेनवर हल्ले केले आहेत. यामुळे युक्रेनमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यात सोमवारी बेलारूस सीमेजवळ द्विपक्षीय बोलणी सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान युक्रेनियन सैन्याने म्हटले आहे की रशियन सैन्याने आक्रमणाची तीव्रता कमी केली आहे. तरीही काही भागात संघर्ष सुरु आहे. गेल्या पाच दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.

रविवार हा त्यांच्या सैन्यासाठी कठीण दिवस होता. कारण रशियन सैन्याने चोहोबाजूंनी गोळीबार सुरू ठेवला होता, असेही युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत १४ मुलांसह ३५२ नागरिक मारले गेले असल्याची माहिती युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

रशियाकडून युक्रेनवर हल्ले (Russia Ukraine war) सुरू असतानाच, अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी, 'न्यूक्लिअर डिटरंट फोर्स'नी हाय अलर्टवर राहावे, असे आदेश रविवारी जारी केले होते. आपली अण्वस्त्रे कुठल्याही क्षणासाठी सज्ज ठेवावीत, असे पुतीन यांनी या आदेशात म्हटले होते. दरम्यान, युक्रेनने चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर रशियाच्या शिष्टमंडळाबरोबर बेलारूसच्या सीमेवर उभय देशांदरम्यान चर्चा सुरू होते आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. रशियाकडून होणार्‍या हल्ल्यांना युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. कीव्ह आणि खार्किव्हमध्ये रशिया आणि युक्रेनचे सैन्यात चकमकी सुरू आहेत. रशियाने रविवारी पेट्रोलियम बेससह युक्रेनमधील गॅस पाईपलाईनही उद्ध्वस्त केली होती. लगोलग रशियाकडून कीव्ह शहरावर अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, असा 'अलर्ट' युक्रेनकडून जारी करण्यात आला.

SCROLL FOR NEXT