Latest

दैनिक पुढारी Rise UP महिला क्रीडा स्पर्धा : पुण्यातील यशानंतर आता कोल्हापुरात आयोजन

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला सशक्तीकरणासाठी समाजात विविध उपक्रम आयोजित केले जातात. विविध सरकारी योजनांमधून, कार्यक्रमांमधून स्त्री सशक्तीकरणाबाबत बोललं जातं. पण बऱ्याच वेळा या कार्यक्रमांची चौकट ठरलेली असते. महिला सक्षमीकरणाच्या पारंपरिक चौकटींना छेद देत पुढारीने एक नवी सुरुवात मागील वर्षी केली, ती म्हणजे Rise Up या महिलांच्या क्रीडा स्पर्धा. पुण्यात सलग दोन वर्षे या क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धांना पुणे, पिंपरी चिंचवाड परिसरातून फारच चांगला प्रतिसाद मिळाला.

आता यशानंतर कोल्हापुरात या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. २ ते ४ फेब्रुवारीमध्ये या अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. 'पुढारी'ने उद्याच्या सक्षम स्त्रीला Rise up च्या निमित्ताने नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिला, विद्यार्थिनींमधील खेळाच्या उपजत गुणांना, आवडीला वाव देण्याचा स्तुत्य प्रयत्न मागील वर्षापासून Rise Up च्या माध्यमातून पुढारी माध्यम समूह करत आहे. Rise up या महिलांच्या मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवणारा पुढारी हा पहिलाच माध्यम समूह आहे. मागील वर्षी या स्पर्धांचा सीझन वन उत्साहात झाला. तर यंदा सीझन दोनही अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण या पूर्ण जिल्ह्यातील महिलांकरता घेण्यात आल्या होत्या.

अशा होतात पुण्यातील Rise UP स्पर्धा

मागील वर्षी मागील वर्षी पुण्यात एकूण नऊ प्रकारांमध्ये स्पर्धा झाल्या. यामध्ये अॅथलेटीक्स, कॅरम, चेस, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, जलतरण यांचा समावेश होता. विशेष म्हणजे पहिलाच सीझन असून या स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांच्या पहिल्याच सीझनमध्ये साडेतीन हजार पेक्षा अधिक मुली/महिला स्पर्धक विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्या. यामध्ये पाच वर्षांपासून ते पन्नास वर्षांपर्यंत विद्यार्थिनी, मुली, महिला तसेच नोकरी करणा-या महिलाही सहभागी झाल्या होत्या. आपलं शिक्षण किंवा कार्यक्षेत्र सांभाळून खेळांची आवड जोपासणाऱ्या या महिलांना Rise up च्या निमित्ताने आपल्या खेळातील कौशल्याला वाव देण्याची संधी मिळाली.

नेटके नियोजन | Rise Up

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नव्हते हे या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्यासोबतच त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रियाही अतिशय उत्साहवर्धक होत्या. त्यामुळे यातून प्रेरणा घेऊन Rise up ची सीझन दोनची नांदी झाली.

पुण्यातील Rise UP या दैनिक पुढारी आयोजित क्रीडा स्पर्धांतील सहाभागी खेळाडू

असा झाला सीझन २ | Rise Up

Rise up च्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनची सुरुवात उदंड उत्साहात आणि भरघोस प्रतिसादात झाली. दुसऱ्या सीझनमध्ये एकूण आठ प्रकारांमध्ये स्पर्धा झाल्या. यामध्ये अॅथलेटीक्स, कॅरम, चेस, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जलतरण या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. वर लिहिल्याप्रमाणे सीझन एक पेक्षा दुसरा सीझन खेळाडूंच्या लक्षणीय सहभागाचा ठरला. दुसऱ्या सीझनमध्ये जवळपास पाच हजाराहून अधिक महिला विविध क्रीडाप्रकारात सहभागी झाल्या.

या स्पर्धांच्या प्रतिसादाचं यश जितकं खेळाडूंच आहे तितकंच यामागे सतत तत्पर आणि कार्यरत असलेल्या हातांचंही आहे. एकूणच नियोजन आणि सोबत असलेल्या मान्यता प्राप्त असोसिएशन , सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धाकांचा वाढत असलेल्या प्रतिसाद यामुळे या स्पर्धांचे लौकिक आणखी वाढत आहे.

Rise Up मधून टॅलेंट हंट

Rise up मधील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सर्टिफिकेट देण्यात आले. तर विजेत्या स्पर्धकाला सुवर्ण, रौप्य तसेच कांस्य पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली. पुणे परिसरासाठी Rise up ही स्पर्धा टॅलेंट हंट ठरत आहे. काही कारणास्तव विशिष्ट खेळाच्या प्लॅटफॉर्मला मुकलेल्या अनेक खेळाडूंनी इथे चमकदार कामगिरी गेली. मुळातच या स्पर्धेचा उद्देश असा होता की यातूनच भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले जातील. Rise up च्या दोन्ही सीझनमधून हा उद्देश पुरेपूर सफल झाला.

पुण्यातील दैनिक पुढारी आयोजित Rise UP या महिलांच्या क्रीडा स्पर्धांतील एक चुरशीचा क्षण

कोल्हापुरातील स्पर्धेसाठी नोंदणी

शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रकवर या स्पर्धा होणार असून यासाठी कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिशनच्या सहकार्याने कोल्हापुरात या स्पर्धा होतील. स्पर्धकांनी या लिंकवर नोंदणी करावी ही विनंती. ही नोंदणी २७ जानेवारीपर्यंत करता येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, इतर नियम आणि अटी या लिंकवर वाचता येतील.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT