

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दै.'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने केवळ मुली व महिलांसाठी सुरू केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. या स्पर्धेतून नवोदित खेळाडूंना वेगळे व्यासपीठ मिळाले असून, जिल्ह्याला नवीन खेळाडू मिळतील, अशी आशा 'हिंदकेसरी' अमोल बराटे यांनी व्यक्त केली.
दै. 'पुढारी' आयोजित 'राईझ अप सीझन 2' कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कुस्तीपटू संतोष काळेकर, दत्ता भिलारे, राष्ट्रीय कुस्तीपंच चंद्रकांत मोहोळ यांसह अनेक कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संलग्नतेने आणि सह्याद्री नॅशनल स्कूल यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आल्या आहेत.
दै. 'पुढारी'ने या वर्षी 'राईझ अप सीझन 2' चे आयोजन केले असून, याची सुरुवात या वर्षी सप्टेंबर 23 मध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेने झाली आहे. या दोन्ही स्पर्धांना अनेक मुली, महिला स्पर्धकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. या दोन स्पर्धांनंतर आता 'राईझ अप सीझन 2' मध्ये महिलांसाठी पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, याही स्पर्धेला कुस्तीपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या स्पर्धा 30 किलो, तसेच 35, 40, 45, 50, 55, 58, 62, 68 आणि 72 किलो अशा दहा वजनी गटांमध्ये होणार असून, 160 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील प्रत्येक वजनी गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिके, मेडल्स व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
विशेष म्हणजे या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. 'पुढारी' हा एकमेव माध्यम समूह आहे. या स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्युट आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
हेही वाचा