Rise Up : नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन ही काळाची गरज : बाबूराव चांदेरे | पुढारी

Rise Up : नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन ही काळाची गरज : बाबूराव चांदेरे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै.‘पुढारी’ ने आयोजित केलेल्या केवळ महिलांसाठीच्या राईझ अप जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या राज्यातच नव्हे तर देशामध्ये नवा आदर्श घालून दिला आहे. अशा पध्दतीने नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

दै. पुढारी च्या वतीने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित राईझ अप जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  या वेळी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव संदिप पायगुडे, दै. पुढारीच्या मार्केटिंगचे नॅशनल हेड आनंद दत्ता, मार्केटिंगचे पुणे युनिट प्रमुख संतोष धुमाळ, एचआर प्रमुख आनंद कुलकर्णी, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांसह मान्यवर उपस्थित होते.

चांदेरे म्हणाले, दै. पुढारीने ज्या पध्दतीने केवळ महिलांसाठी आणि नवोदित खेळाडूंना संधी देण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या त्याचप्रमाणे संघटनेनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत वरिष्ठ गटाऐवजी कनिष्ठ गटाचा संघ खेळवला.

त्याचा परिणाम म्हणजे अनेक वर्षांनंतर या स्पर्धेत महाराष्ट्राला तृतीय स्थान मिळाले असून, पदक प्राप्त झाले. दै. पुढारीचे ध्येय आणि धोरण यामुळे अनेक नवोदित खेळाडू नक्कीच आगामी काळात संघटनेला मिळतील.

दै. पुढारीच्या ध्येयाचे मीडियातील इतरांनी अनुकरण करावे यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

विक्रमी प्रतिसाद; 99 संघ सहभागी

दै पुढारीने यावर्षी आयोजित केलेल्या राईज अप सिझन 2 जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी किशोरी, कुमारी आणि खुल्या गटामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा येथील 99 संघांनी सहभाग घेऊन विक्रमी प्रतिसाद दिला आहे पुढारी आयोजित स्पर्धेतील हा उच्चांकी सहभाग आहे.

दै. ‘पुढारी’ने ज्या पध्दतीने केवळ महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, यातून नक्कीच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू पुणे शहराला व पर्यायाने राज्याला मिळणार आहेत. प्रत्येक खेळाडूमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा  दै. ‘पुढारी’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. स्पर्धेतील सहभागी मुलींच्या कामगिरीनुसार इतर मुलींनाही प्रेरणा मिळणार आहे.
– डॉ. संजय चोरडिया,  संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट

 

 

हेही वाचा

Back to top button